नागपूर,
dignitaries praise green दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांनी नागपूरच्या मनीष नगर परिसरातील राठोड कुटुंबीयांनी आपल्या निवासस्थानाच्या टेरेसवर साकारलेल्या ‘वसंतराव नाईक परसबागे’ला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी परसबागेची पाहणी करून राठोड कुटुंबीयांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले. श्रीपत राठोड, त्यांच्या पत्नी जयश्री राठोड तसेच कन्या दिपाली आणि अंजली राठोड यांनी परिश्रमपूर्वक विकसित केलेल्या या परसबागेत २०० हून अधिक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींसह रसायनमुक्त फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच नैसर्गिक जीवनशैलीचा संदेश देणारी ही परसबाग नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

यावेळी श्रीपत राठोड यांनी परसबागेची संकल्पना, विविध वृक्षांची माहिती तसेच लागवडीची संपूर्ण प्रक्रिया उपस्थितांना सविस्तर सांगितली. परसबागेत एकावेळी सुमारे ४० जण उभे राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून योगाभ्यासासाठी स्वतंत्र जागाही तयार करण्यात आली आहे. तसेच चालताना आरोग्यदायी लाभ मिळावा यासाठी ॲक्युप्रेशर पथही विकसित करण्यात आले आहे. अंजली राठोड यांनी विविध शिल्पांचा वापर करून परसबागेचे सौंदर्य अधिक खुलविले आहे.
प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांनी आपल्या मनोगतात राठोड दाम्पत्याने आपल्या इयत्ता अकरावी व बारावीत शिक्षण घेणाऱ्या कन्या अंजली आणि दिपाली यांच्यामध्ये कृषी, पर्यावरण आणि निसर्गप्रेमाचे संस्कार रुजविल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी अंजली आणि दिपाली यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून परसबागेची संकल्पना व तिची वैशिष्ट्ये सादर केली. याप्रसंगी श्रीपत राठोड यांनी आपला ‘सत्य क्रांती’ हा स्वरचित काव्यसंग्रह प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांच्या हस्ते मराठी विभागाचे प्रा. सतीश कर्पे यांना भेट दिला. जयश्री राठोड यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली. राठोड कुटुंबीयांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. विकास सिडाम, कॅप्टन डॉ. सुजित चव्हाण, प्रा. सतीश कर्पे, प्रा. डॉ. प्रभज्योत कौर, प्रा. प्रफुल्ल ब्राह्मणे, प्रा. विनीत झामरे, प्रा. रश्मी झळके तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: प्रफुल ब्राह्मणे, संपर्क मित्र