तभा वृत्तसेवा
दिग्रस,
sanjay-rathod : दिग्रस शहर व तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य कौतुक सोहळा गुरुवार, 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दारव्हा मार्गावरील राजेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाèया विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मागील 17 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संजय राठोड हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू प्रदान करणार आहेत.
यावेळी पालकांचाही सत्कार करण्यात येणार आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहून या गौरव सोहळ्याचा मान स्वीकारावा, असे आवाहन शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.