दुसर्‍या यादीत ७१ गावातील ४४७५ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
कारंजा लाड,
farmers benefit from loan waivers राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कारंजा तालुयातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाने २५ जुलै रोजी कर्जमाफीची दुसरी यादी पंढरपुरातून जाहीर केली असून, या यादीत कारंजा तालुयातील तब्बल ४ हजार ४७५ पात्र शेतकर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना मोठा आधार मिळाला आहे.
 
 
farmers benefit from loan waivers
 
दुसरी यादी प्रसिद्ध होताच तालुयातील बँका, सेवा सहकारी संस्था, महा-ई-सेवा केंद्रे व सीएससी केंद्रांवर लाभार्थ्यांनी आपल्या नावाची खात्री करण्यासाठी मोठी गर्दी केली. राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी ही कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर शेतकर्‍यांचे लक्ष या योजनेकडे लागले होते. पहिल्या यादीत अनेक शेतकर्‍यांची नावे समाविष्ट झाली नव्हती, तर दुसर्‍या यादीत मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना संधी मिळाल्याने तालुयात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या दुसर्‍या यादीमध्ये सेवा सहकारी सोसायट्या, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच विदर्भ कोकण ग्रामीण यासह इतर बँकेच्या पात्र कर्जदारांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित बँकांनी शासनाच्या पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पात्र शेतकर्‍यांना ई-केवायसी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा लाभ अंतिम स्वरूपात मंजूर होणार आहे.
 
 
गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, वाढलेला उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा बाजारभाव यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. अशा परिस्थितीत कर्जाचा बोजा वाढल्याने अनेक कुटुंबांवर मोठा ताण निर्माण झाला होता. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्‍यांना नव्याने उभारी मिळणार असून, आगामी हंगामासाठी आर्थिक नियोजन करण्यास मदत होणार आहे, अशी भावना अनेक लाभार्थी शेतकर्‍यांनी व्यक्त केली. चुकीची माहिती किंवा अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यादीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.