नाशिक,
Four earthquake tremors in Nashik नाशिक जिल्ह्यात सलग भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाची नोंद होत असून, मंगळवारी अवघ्या सहा तासांच्या कालावधीत चार धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या हादऱ्यांमध्ये कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. २५ ते २८ जुलैदरम्यान सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील सहा गावांमध्ये भूकंपाचे धक्के नोंदविण्यात आले. २५ जुलै रोजी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे सलग चार वेळा भूकंप झाला, तर दिंडोरी परिसरात दोन धक्के जाणवले. २६ जुलैला मानेस आणि भोरमाळ परिसर हादरला. त्यानंतर २७ जुलै रोजी पेठ तालुक्यातील कोठुळा आणि आंबे गावांमध्ये भूकंपाची नोंद झाली. मंगळवारी पुन्हा याच भागात अनेक वेळा धक्के जाणवल्याने चिंता अधिक वाढली आहे.
वारंवार होत असलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणे, पूल, शासकीय इमारती, शाळा, वसतिगृहे आणि अन्य महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य टाळावे, प्रशासनाच्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हावे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्याचा भूकंपाचा इतिहास लक्षात घेता ऑगस्ट महिन्यातही अशा धक्क्यांची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने सुरक्षित स्थळांचीही तयारी करून ठेवली आहे.