अडचणींना संधी मानत यशाचे शिखर गाठणारी शिक्षिका

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
विजय पतंगपुरे
geeta shinde काही माणसांची कहाणी ही फक्त त्यांच्या यशाची नसते, तर ती अनेकांना जगण्याची नवी उमेद देणारी असते. प्रा. डॉ. गीता शिंदे यांचा जीवनप्रवास त्यापैकीच एक ...
 
 

from struggle to success the inspiring journey of professor dr geeta shinde 
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या डॉ. गीता शिंदे आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाच्या विभागप्रमुख पदापर्यंत पोहोचल्या आहे. मात्र या यशामागे संघर्ष, जिद्द आणि शिक्षणावरील निष्ठेची मोठी कहाणी दडलेली आहे.महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील भागात त्यांचा जन्म झाला. बालपण साध्या वातावरणात गेले. आई अशिक्षित होती, तर वडिल शिक्षित असूनही कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे त्यांना शक्य नव्हते. लहानपणीचे शिक्षण त्या कन्नड माध्यमातून शिकल्या. नंतर कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि अचानक मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे लागले.लहान वयात भाषा बदलणे सोपे नव्हते. वर्गातील धडे समजून घेण्यासाठी त्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागत होती. प्रा. डॉ. पण त्यांनी हार मानली नाही. परिस्थिती कठिण होती, मात्र शिक्षण सोडायचे नाही, हा निर्धार अधिक मजबूत होता.
पुढे पुण्यातील सेवा सदन शाळेत त्यांचे शिक्षण झाले. आयुष्याचा प्रवास सुरू असतानाच १९९३ मध्ये त्यांचा विवाह झाला. अनेक महिलांसाठी लग्न म्हणजे शिक्षणाला पूर्णविराम ठरतो. पण गीता शिंदे यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. संसार, मुलांचे संगोपन आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी बाह्य शिक्षण पद्धतीने बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.त्या आठवण सांगतात, मुलं अभ्यास करत होती आणि त्यांच्यासोबत मीही शिकत होते. त्यांच्या पुस्तकांसोबत माझीही पुस्तकं उघडी असायची.घरात शिक्षकांचे वातावरण असल्याने अध्यापन क्षेत्राकडे त्यांचा ओढा वाढत गेला. त्यांनी बी.एड., त्यानंतर एम.एड. पूर्ण केले. पुढे एम.ए. हिंदी आणि एम.ए. समाजशास्त्र अशा पदव्याही मिळवल्या. गीता शिंदे शिक्षण क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी त्यांनी नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण केल्या. २००६ मध्ये त्या विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यास आणि विद्यार्थ्यांशी असलेली बांधिलकी यामुळे आज त्या विभागप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
 
 
शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांशी निर्माण झालेले नाते हेच त्यांच्या आयुष्याचे खरे समाधान आहे. त्या सांगतात, एखादा विद्यार्थी अनेक वर्षांनी भेटतो आणि 'मॅडम, तुमच्यामुळे माझं आयुष्य बदललं,' असं म्हणतो, तेव्हा सगळ्या कष्टांचं चीज झाल्यासारखं वाटतं.शिक्षण क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित राहिले नाही. महिला आघाडी, शिक्षक संघटना आणि विद्यापीठातील विविध समित्यांमध्ये त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत त्यांनी नेतृत्वगुणही सिद्ध केले.
 
 
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील त्या सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. म्हणतात, अडचणी आपल्याला खचवत नाहीत; त्या आपल्याला अधिक सक्षम बनवतात. प्रत्येक संकटातून काहीतरी शिकायला मिळतं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळ्याने मला अधिक मजबूत केलं. आजच्या शिक्षकांसाठी त्यांचा संदेशही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता असते. शिक्षकांनी केवळ विषय शिकवू नये, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा द्यावी. संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही शिक्षकांची खरी जबाबदारी आहे.हा प्रवास सहज नव्हता. पण जिद्द, मेहनत आणि शिक्षणावरील विश्वास यांच्या जोरावर डॉ. गीता शिंदे यांनी तो यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांची कहाणी प्रत्येक मुलगी, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकाला एकच संदेश देते परिस्थिती कितीही कठिण असली तरी शिक्षणाची ओढ आणि प्रयत्नांची तयारी असेल, तर कोणतेही स्वप्न दूर नसते.