एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी सरकारचा यू-टर्न!

१ सप्टेंबरपर्यंत मिळाली मुदत

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Government's U-turn on ST smart cards राज्य परिवहन महामंडळाच्या बसप्रवासातील विविध शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्डाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता हे कार्ड १ ऑगस्टऐवजी १ सप्टेंबरपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.राज्य शासनाकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के भाडे सवलत दिली जाते. या सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अनेक पात्र नागरिकांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप कार्ड मिळाले नसल्याने त्यांची गैरसोय होण्याची शक्यता होती.
 
 

st 
ही बाब लक्षात घेऊन सरकारने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, तांत्रिक किंवा प्रक्रियेमधील अडचणींमुळे कोणताही पात्र प्रवासी शासकीय सवलतींपासून वंचित राहू नये, हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीनेही सवलतींचा लाभ सुरू राहणार आहे. दरम्यान, राज्याती विविध एसटी बसस्थानके आणि आगारांमध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही ठिकाणी हे कार्ड जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, पात्र प्रवाशांनी वाढीव कालावधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.