ज्येष्ठ नागरिक महामंडळाच्या सभेत गुरुतत्त्वाचा जागर

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
नागपूर,
guru purnima ‘ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ’च्या मासिक सभेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. अमृता यांनी गुरूचे महत्त्व अधोरेखित करताना, जीवनात आई हीच पहिली गुरू असते. मात्र, ऐहिक जीवनातून पारलौकिक जीवनाकडे नेणारे सद्गुरू ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ मानले जातात. शिष्याच्या सर्व शंकांचे निरसन करून त्याला सन्मार्ग दाखविण्याचे कार्य गुरू करतात. तसेच मातृऋण, पितृऋण, समाजऋण आणि राष्ट्रऋण फेडण्याची प्रेरणाही गुरूकडूनच मिळते, असे प्रतिपादन केले.
 
guru pornima
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजश्री अंबारे यांनी डॉ. अमृता यांचा परिचय करून देत त्यांचा सत्कार केला. सचिव अशोक भुताड यांनी प्रास्ताविकातून महामंडळाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी २ ऑगस्ट २०२६ (रविवार) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विरांश फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
 
याशिवाय, डॉ. कुशाल नाईक यांच्या सहकार्याने लवकरच संगणकीय संपूर्ण शरीर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी उल्हास शिंदे यांच्या हस्ते डॉ. कुशाल नाईक यांचा सत्कार करण्यात आला. महामंडळाच्या वतीने विदर्भातील अष्टविनायक दर्शन, बस्तर दर्शन, माहूर-शेगाव दर्शन तसेच २२ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशाखापट्टणम–पिठापूरम सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. सहलीची माहिती कमलाकर नगरकर यांनी दिली.
 
या प्रसंगी यूपीएससी लायब्ररी क्षेत्रातील दहा वर्षांचा अनुभव असलेले तसेच राष्ट्रीय महिला आयोगाशी संबंधित कामाचा अनुभव असलेले किशोर समर्थ यांचाही सत्कार करण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्यात जन्मदिवस असलेल्या सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये नामदेव फटिंग, डॉ. अजय शास्त्री, शालिनी, तुकाराम वैद्य, ईश्वर वानकर, डॉ. लेखराम पाखमोडे, मार्कंडा कुलरवार आणि प्रा. प्रभुजी देशपांडे यांचा समावेश होता.
 
अध्यक्षीय भाषणात ॲड. अविनाश तेलंग यांनी, आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. नियमित तपासण्या करून आजार वेळेत ओळखा आणि योग्य उपचार घ्या. तसेच आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहून सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करा, असे आवाहन केले. डॉ. अरविंद शेंडे यांनी आभार मानले, तर मंजुषा सदावर्ती यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. सामूहिक राष्ट्रगीतानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजाभाऊ अंबारे, वसंता बोकडे, अरविंद शेटे, विनोद व्यवहारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
 
सौजन्य: विनोद व्यवहारे, संपर्क मित्र