मुंबई,
High alert for rain in Maharashtra बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज असून, काही भागांत अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. तर मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत तुलनेने कमी पावसाची शक्यता आहे. मात्र सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका कायम असल्याने प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत.२९ जुलै रोजी पूर्व विदर्भात कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता आहे. ३० जुलैला पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाची तीव्रता वाढेल, तर ३१ जुलै रोजी खानदेश आणि घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातही ३० व ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३० जुलै रोजी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठ, सखल भाग आणि घाटमार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पालघर जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि मदतकार्याचा आढावा घेण्यात आला. बैठकीत पूरग्रस्त कुटुंबांना विद्यमान नियमांपेक्षा अधिक आर्थिक मदत देण्यासाठी विशेष पॅकेज तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याबरोबरच कायमस्वरूपी आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनांवर भर देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
फडणवीस यांनी रस्ते, दळणवळण आणि वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. महावितरणसह वीज कंपन्यांनी पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, तसेच जलसाठे आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहांचे वैज्ञानिक मॅपिंग करून भविष्यातील विकास आराखड्यांमध्ये त्याचा समावेश करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. वसई-विरार परिसरात पाण्याचा निचरा जलद व्हावा यासाठी 'होल्डिंग पॉन्ड्स' विकसित करण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. तसेच पालघर जिल्ह्याचा सविस्तर बेस मॅप तयार करून भविष्यातील विकास, पाणी निचरा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिल्या.