अमरावती,
avinash-avalgaonkar : दिंडी, प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सामान्य माणसाला विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालून जीवन जगण्याचा नवा मार्ग देणारे प्रबोधन दादासाहेबांनी केले. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदावर कुलगुरू म्हणून कार्य करणारे दादासाहेब हे आध्यात्मिक क्षेत्रात प्रबोधन करणारे इतिहासातील पहिले आणि शेवटचे कुलगुरू होते, असे गौरवोद्गार रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी काढले.

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकिय महाविद्यालय परिसरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी सांयकाळी आयोजित स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या २९ व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून दै. तरूण भारतचे मुख्य संपादक शैलेश पांडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाष बेलसरे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तसेच विशेष अतिथी म्हणून सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांची उपस्थिती होती. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर, भैय्यासाहेब पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, सदस्य केशवराव गांवडे, जनार्दन खोटरे, सुभाष बनसोड, सचिव वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉ. अंबादास कुलट, अमोल महल्ले व स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांची विचारमंचावर उपस्थिती होती.
कुलगुरू आवलगावकर पुढे म्हणाले की, दादासाहेबांनी समाजामध्ये वावरताना होणाऱ्या टिकाटिप्पणींची दखल न घेता आपल्या कार्याचा सरळ माग ठेवत अनेकांच्या जीवनात नवसंजीवनी निर्माण केली. आध्यात्म ही खरी शक्ती असून त्यांनी विज्ञानाच्या उंचीला पार करून आध्यात्माची उंची गाठली. माणसामध्ये देव शोधणाऱ्या संत गाडगेबाबा आणि भाऊसाहेबांचा वारसा दादासाहेबांनी चालविला. आध्यात्म आणि विज्ञानाचा समन्वय साधून मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा विचार करणारे हे द्रष्टे नेतृत्व होते.
संपादक शैलेश पांडे म्हणाले की, दादासाहेबांनी नागपूर विद्यापीठात आपल्या अधिकाराचा वापर करून हजारो विद्यार्थी आणि सामान्य माणसाचे कल्याण केले आहे. दादासाहेबांच्या परिस्पर्शाने अनेकांचे जीवन उजळले. इतिहासात आज आणि उद्या देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली जाईल व आपल्यासाठी ते मार्गदर्शक राहतील. याप्रसंगी डॉ. महेंद्र ढोरे आणि सुभाष बेलसरे यांनी देखील दादासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले अनुभव सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दादासाहेबांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रास्ताविकातून हेमंत काळमेघ यांनी आयोजनामागची भूमिका तसेच प्रतिष्ठानच्या मार्फत सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. दादासाहेबांवर प्रेम करणाऱ्या हजारो नागरिकांचे आभार देखील त्यांनी प्रकट केले. उल्लेखनिय म्हणजे सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी प्रबोधनपर कीर्तनातून दादासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकून अनेक सामाजिक विषयावर प्रकाश टाकला.
सूत्रसंचालन डॉ. मंदा नांदूरकर तसेच आभार नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, स्व. दादासाहेब काळमेघ यांच्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, कर्मचारी तसेच सामाजिक, राजकीय आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.