मिशिगन
Horrifying murder in the US अमेरिकेतील मिशिगन राज्यात एका कुटुंबाचा हृदयद्रावक अंत झाल्याची घटना समोर आली आहे. ४७ वर्षीय क्रिस्टोफर कॅरोलकिव्हिक्झ याने आपल्या पत्नीसह सहा अल्पवयीन मुलांवर गोळीबार करून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना ग्रँड हेवन टाउनशिपमधील त्यांच्या राहत्या घरी घडली. मृतांमध्ये ३९ वर्षीय अमांडा ‘मँडी’ कॅरोलकिव्हिक्झ आणि ५ ते १५ वर्षे वयोगटातील सहा मुलांचा समावेश आहे. २४ जुलै रोजी घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. घरात पती-पत्नी आणि त्यांच्या सहा मुलांचे मृतदेह आढळून आले. ओटावा काउंटी शेरीफ कार्यालयाने सर्व आठ जणांचा मृत्यू गोळीबारामुळे झाल्याची पुष्टी केली असून, या प्रकरणाकडे हत्या आणि त्यानंतर आत्महत्येच्या दृष्टीने तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात गोळीबारानंतर घरातील विविध ठिकाणी मुद्दाम आग लावल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत कुटुंबातील पाळीव प्राण्यांचाही मृत्यू झाला.

तपासादरम्यान अमांडा यांनी २०२४ मध्ये 'MandyK1179' या नावाने रेडिटवर केलेल्या काही पोस्ट समोर आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी पतीचे एका तरुण इंटर्नसोबत कथित विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यांनी लिहिले होते की, स्वतः इंटर्न असताना त्यांची क्रिस्टोफरशी ओळख झाली होती. विवाहानंतर अनेक वर्षे संसार आणि मुलांचा सांभाळ केल्यानंतरही पतीने पुन्हा एका इंटर्नसोबत संबंध ठेवले, असा त्यांचा दावा होता.अमांडाने आपल्या पोस्टमध्ये वैवाहिक आयुष्यातील संघर्षाचाही उल्लेख केला होता. मुलांच्या भविष्यासाठी विवाह टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे, तसेच पतीच्या वागणुकीमुळे मानसिक धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर दोघांनी वैवाहिक समुपदेशनही घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. पती वारंवार काही गोष्टी लपवत असल्यामुळे नात्यात तणाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी लिहिले होते.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही दिवसांपूर्वीच क्रिस्टोफर कॅरोलकिव्हिक्झ यांची अमेरिकन हार्ट असोसिएशनमधील विक्री आणि विपणन विभागाच्या उपाध्यक्षपदावरील नोकरी गेली होती. दुसरीकडे, बँकिंग आणि विमा क्षेत्रात काम केल्यानंतर अमांडा या ग्रँड हेवन एरिया पब्लिक स्कूल्समध्ये पर्यायी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. दोघांची ओळख एका पेय कंपनीत काम करत असताना झाली होती आणि ऑगस्ट २००९ मध्ये त्यांनी विवाह केला होता. जवळपास १७ वर्षांचा संसार एका भीषण कौटुंबिक शोकांतिकेत संपुष्टात आला.