स्वस्त टूरचा सापळा; भारतीयांचे अपहरण, पाकिस्तानी मास्टरमाईंड!

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
बँकॉक,
indian-tourists-harassed : परदेशात अत्यंत स्वस्तात फिरायला नेण्याचे आमिष दाखवून भारतीय पर्यटकांना जाळ्यात ओढणाऱ्या आणि त्यांचा छळ करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. थायलंडमध्ये फिरायला गेलेल्या काही भारतीय पर्यटकांना डांबून ठेवून, त्यांचा आठवडाभर छळ करण्यात आल्याची आणि त्यांना उपाशी ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
 
indian-tourists-harassed
 
 
 
दुबईच्या क्रमांकावरून खंडणीची मागणी
 
मिळालेल्या माहितीनुसार, या पर्यटकांना थायलंडमध्ये पोहोचल्यानंतर एका अज्ञात ठिकाणी ओलीस ठेवण्यात आले होते. या फसवणुकीमागे पाकिस्तानी टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले असून, ही टोळी दुबईच्या व्हर्च्युअल दूरध्वनी क्रमांकांचा वापर करून भारतातील पर्यटकांच्या नातेवाईकांकडे मोठ्या रकमेची खंडणी मागत होती. पैसे न दिल्यास पर्यटकांना जीवे मारण्याची धमकी दिली जात होती.
 
आठवडाभर अन्न-पाण्यावाचून छळ
 
ओलीस ठेवण्यात आलेल्या पर्यटकांना सलग सात दिवस एका बंद खोलीत अन्न आणि पाण्यावाचून ठेवण्यात आले होते. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांच्याकडून नातेवाईकांना फोन करायला लावले जायचे. भारतीय दूतावास आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी वेगाने सूत्रे हलवून पर्यटकांची सुटका केली.
 
नागरिकांना सावधानतेचा इशारा
 
सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर मिळणाऱ्या अतिशय स्वस्त आणि संशयास्पद परदेशी टूर पॅकेजच्या आमिषाला नागरिकांनी अजिबात बळी पडू नये, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालय आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, कोणत्याही अनधिकृत ट्रॅव्हल एजन्सीकडून बुकिंग करण्यापूर्वी त्यांची पूर्ण शहानिशा करणे अत्यंत गरजेचे आहे.