सागरी सुरक्षेवर भारताची गर्जना!

संयुक्त राष्ट्रात हल्ल्यांचा निषेध

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
संयुक्त राष्ट्र,
India's protest at the United Nations होर्मुझ सामुद्रधुनीत भारतीय खलाशी असलेल्या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ठामपणे उपस्थित केला आहे. सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी या घटनांचा तीव्र निषेध करत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या हल्ल्यांमध्ये एक भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे, तर अनेक भारतीय जखमी झाल्याची माहिती त्यांनी परिषदेसमोर मांडली.
 
 

India 
 
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पी. हरीश यांनी जीएफएस गॅलेक्सी, एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या जहाजांसह होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या अनेक व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचा कठोर शब्दांत निषेध केला. खलाशांना लक्ष्य करणे आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील मुक्त व सुरक्षित नौवहनात अडथळे निर्माण करणे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारताने सुरक्षा परिषदेला व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले तातडीने थांबवण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करून होर्मुझ सामुद्रधुनीसह सर्व महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील वाहतूक आणि व्यापार पूर्ववत करण्याची मागणीही भारताने केली.
 
 
पी. हरीश यांनी मध्यपूर्वेचे भारतासाठी असलेले सामरिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले. आखाती प्रदेशात सुमारे १ कोटी भारतीय वास्तव्यास असून त्यांची सुरक्षा आणि कल्याण हे भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारताचा या प्रदेशाशी व्यापार आणि ऊर्जा पुरवठा मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे.यावेळी त्यांनी आर्थिक संबंधांची माहितीही दिली. आखाती देशांसोबत भारताचा वार्षिक द्विपक्षीय व्यापार सुमारे १८० अब्ज अमेरिकी डॉलर इतका आहे. या प्रदेशातून भारतात ३१ अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक थेट परकीय गुंतवणूक झाली असून, जीसीसी देशांमधून भारतात ५२ अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त परकीय चलन येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मध्यपूर्वेत शांतता, स्थैर्य आणि सुरक्षित सागरी वाहतूक कायम ठेवणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.