तेहरान,
Iran launches missile strike on the US मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढला असून इराणने अमेरिकी लष्करी तळांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) केला आहे. काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तुलनेने शांतता असताना या घटनेमुळे पुन्हा संघर्ष भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेंटकॉमने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सायंकाळी ५:४५ वाजता (ईटी) इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने इराणमधून अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या क्षेपणास्त्रांचा उद्देश मध्यपूर्वेत तैनात अमेरिकी सैन्याला लक्ष्य करण्याचा होता. मात्र, अमेरिकी संरक्षण यंत्रणेने सर्व क्षेपणास्त्रे यशस्वीरीत्या हवेतच रोखली असून कोणतीही हानी झालेली नाही. अमेरिकी सैन्य पूर्णपणे सतर्क असल्याचेही सेंटकॉमने स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता कमी झाल्याने दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या मार्गावर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, या नव्या घडामोडीमुळे मध्यपूर्वेतील सुरक्षा परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण बनली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरूनही दोन्ही देशांमध्ये वाद कायम आहे. जगातील सुमारे २० टक्के तेलाचा पुरवठा या सागरी मार्गातून होत असल्याने या भागातील कोणताही संघर्ष जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम करू शकतो. यापूर्वी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे या मार्गावरील ऊर्जा वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
दरम्यान, इराणच्या गोठवलेल्या निधीवरूनही वाद अधिक तीव्र झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजे आणि मालाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई इराणच्या गोठवलेल्या निधीतून केली जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना इराणने इशारा दिला आहे की, अशी कोणतीही कारवाई झाल्यास संबंधित देश किंवा कंपन्यांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्ग देण्यात येणार नाही. त्यामुळे या भागातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.