‘लाच’, ‘खून’ आणि ‘कोट्यवधींची फसवणूक’

तीन धक्कादायक घटनांनी शहर हादरले

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
जालना
jalna जालना शहरातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील राज्य कर अधिकारी सुवर्णा रामेश्वर लोहिया यांना ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईत त्यांच्यासोबत त्यांचा खासगी कर सल्लागारही एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 

jalna shaken by three major incidents: bribe case, murder and crore fraud 
तक्रारदाराचे जालना शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान असून त्यांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) ब्लॉक झाल्याप्रकरणी जीएसटी कार्यालयाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. हे इनपुट टॅक्स क्रेडिट अनब्लॉक करून देण्यासाठी संबंधित महिला अधिकाऱ्याने खासगी कर सल्लागारामार्फत एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम ६० हजार रुपयांवर निश्चित झाली. त्यानुसार लाच स्वीकारताना एसीबीच्या जालना पथकाने सापळा रचून महिला अधिकारी आणि कर सल्लागार या दोघांनाही ताब्यात घेतले.
दरम्यान, जालना शहरात jalna आणखी एका धक्कादायक घटनेत नवीन जालना परिसरात २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मयूर मेंढरे असे मृत युवकाचे नाव असून पैशांच्या देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हत्या करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे, परभणी शहरात बँकेत खाते उघडल्यास एक हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून आठ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने या आठ जणांच्या बँक खात्यांचा वापर करून तब्बल ६ कोटी ९७ लाख ३९ हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला बँकेकडून सायबर फसवणुकीची नोटीस मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी आरोपी अविनाश आव्हाड आणि इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.