पंढरपूर वारीतून कारंजा आगाराची २० लाखाची कमाई

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
२८,८२८ किमीचा प्रवास
 
 
कारंजा लाड,
pandharpur wari आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुमिणी दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकर्‍यांच्या सेवेत यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कारंजा आगार अग्रस्थानी राहिले. वारकर्‍यांच्या सोयीसाठी आगाराकडून विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सेवेला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने कारंजा आगाराने प्रवासी सेवा, नियोजन आणि उत्पन्न या तिन्ही बाबतीत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे.
 
 
pandharpur wari
 
वारी कालावधीत कारंजा आगारातून २७ जुलै पर्यंत एकूण ५८ विशेष फेर्‍या चालविण्यात आल्या. या सर्व बसांनी मिळून २८,८२८ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या विशेष बससेवेतून आगाराला २०,३५,३१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, वारी कालावधीतील ही कामगिरी आगारासाठी अत्यंत समाधानकारक मानली जात आहे. वारकर्‍यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे एसटी महामंडळाच्या महसुलातही लक्षणीय भर पडली आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या भाविकांना सुरक्षित, वेळेवर आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एसटी महामंडळ अनेक वर्षांपासून यशस्वीपणे पार पाडत आहे.
 
 
यंदाही कारंजा आगाराने ही परंपरा कायम राखत उत्कृष्ट नियोजन केले.विशेष बससेवेसाठी चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांनी समन्वयाने काम केले. बसचे वेळापत्रक, वाहनांची तांत्रिक तपासणी, अतिरिक्त वाहनांची उपलब्धता, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण वारी कालावधीत बससेवा सुरळीत सुरू राहिली आणि वारकर्‍यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागला नाही. विशेष म्हणजे, कारंजा शहरासह तालुयातील ग्रामीण भागातील भाविकांनीही मोठ्या प्रमाणावर एसटी बसला पसंती दिली. खासगी वाहनांच्या तुलनेत सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारा प्रवास मिळत असल्याने अनेकांनी एसटीनेच पंढरपूर गाठले. परिणामी अनेक फेर्‍यांना समाधानकारक प्रवासी संख्या मिळाली आणि आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.