कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती पुरस्कार सोहळा ४ ऑगस्टला

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
नागपूर,
karmashri durgadas rakshak smriti award कर्मश्री दुर्गादास रक्षक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी प्रदान करण्यात येणारा 'जीवन गौरव पुरस्कार' यंदा ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजीत आणि कार्यरत संपादक प्रमोद काळबांडे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा ४ ऑगस्ट २०२६ (मंगळवार) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत डॉ. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, दाभा, नागपूर येथील सभागृहात होणार आहे.
 
karmashri durgadas rakshak smriti award
 
४ ऑगस्ट हा कर्मश्री दुर्गादास रक्षक यांचा स्मृतिदिन असून ते नागपूरातील आदर्श उद्योजक म्हणून परिचित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ते स्नेहबंधू होते. तसेच श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजजीवनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्याची परंपरा आहे. यापूर्वी श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक आचार्य हरीभाऊ वेरूळकर, आदिवासींच्या उत्थानासाठी कार्यरत डॉ. सतीश गोगुलवार, पर्यावरण क्षेत्रातील डॉ. गिरीश गांधी, समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज, कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधिया तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू इश्तर कुजूर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
यंदाच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विकास झाडे, श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे रवी मानव तसेच कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित राहणार आहेत. या प्रेरणादायी पुरस्कार सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मृन्मयी रक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
 
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र