धक्कादायक आकडे! ७ हजार विद्यार्थी 'HIV'च्या विळख्यात

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
बेंगळुरू,
students-affected-by-aids : कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य तपासणी शिबिरांमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे तब्बल ७ हजार विद्यार्थी एचआयव्ही (HIV) बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, राज्यातील सुमारे ५४ हजार नागरिकांना त्यांना एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे याची पुसटशी कल्पनाही नसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
 

hiv 
 
 
 
कॉलेज तरुणांमध्ये संसर्गाचा धोका वाढला
 
आरोग्य विभागाने महाविद्यालयांमध्ये राबवलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान तरुण वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. असुरक्षित संबंध, आजाराविषयी पुरेशा ज्ञानाचा अभाव आणि सामाजिक स्तरावर या विषयावर बोलण्यास असणारा संकोच, यामुळे तरुणांमध्ये हा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
५४ हजार लोक संसर्गापासून अनभिज्ञ
 
आरोग्य यंत्रणेने व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, कर्नाटकात ५४ हजारांपेक्षा जास्त असे रुग्ण आहेत ज्यांना स्वतःला एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे हे माहितच नाही. यामुळे नकळतपणे हा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरण्याचा धोका प्रचंड पटीने वाढला आहे.
 
आरोग्य विभागाकडून विशेष जनजागृती मोहीम
 
या धक्कादायक आकडेवारीनंतर कर्नाटक सरकार आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण, सुरक्षित संबंध आणि एचआयव्ही संसर्गाची कारणे व उपाय याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी विशेष जनजागृती सत्रे आयोजित केली जात आहेत. तसेच, जास्तीत जास्त लोकांनी मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.