निर्माणाधीन इमारतीवरून पडून चिमुकलीचा मृत्यू

- ठेकेदार, बिल्डरविरुद्ध गुन्हा

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
little-girl-dies : इमामवाडा परिसरातील राय उद्योग कॉम्प्लेक्सच्या निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून सहा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत इमामवाडा पोलिसांनी ठेकेदार आणि बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राशी मनोज नेवारे (६) असे मृत मुलीचे नाव आहे.
 
 
 

jkhn
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राशी नेवारे ही तिची आई सुषमा मनोज नेवारे यांच्यासोबत राय उद्योग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाधीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होती. १५ मे रोजी ती दुसऱ्या मजल्यावर खेळत असताना अचानक तिचा तोल जाऊन खाली पडली. या दुर्घटनेत गंभीर जखमी मुलीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. घटनेनंतर इमामवाडा पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत बांधकामस्थळी सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना नसल्याचे समोर आले. बांधकामाचे ठेकेदार सचिन वसंत गुडधे याने महिलेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, या ठिकाणी पुरेशा उंचीची संरक्षक भिंत (पॅरापेट), सुरक्षा जाळी, संरक्षक कठडे अथवा इतर आवश्यक सुरक्षा साधने बसविण्यात आली नव्हती. त्यामुळे बांधकामस्थळी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोकादायक परिस्थितीत राहावे लागत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील दुसरा आरोपी किशोर गोपिचंद राय हा राय उद्योग कॉम्प्लेक्सचा बिल्डर आहे. बांधकामस्थळी सुरक्षेची पुरेशी व्यवस्था न केल्यास अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, याची जाणीव असूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही, असा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.