मुंबई
maharashtra farmer loan राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजने’बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी महाआयटी (MahaIT) पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, या लाभार्थ्यांची अधिकृत नावे ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 553 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
कर्जमाफीच्या प्रक्रियेदरम्यान राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याचेही समोर आले आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेत थकीत कर्ज, व्याज आणि शिल्लक रकमेमध्ये तफावत आढळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही बाब मान्य करत राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाबाबत तक्रारी वाढल्याचे सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये मोठ्या अडचणी नसल्या तरी राष्ट्रीयकृत बँकांशी संबंधित समस्या वारंवार समोर येत असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. यानंतर सरकारने राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका आणि शासन यांच्यात समन्वय बैठक घेत बँकांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
शासनाच्या निकषांनुसार दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना ‘नील दाखला’ देण्यात येणार असून, या दाखल्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सर्व बँकांना शासनाने सूचना दिल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, त्यासाठी अंदाजे 36 हजार 585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.दरम्यान, 2019 मध्ये लागू करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनाही यावेळी मोठा दिलासा देण्यात आला आहे. या योजनेत यापूर्वी असलेली 50 हजार रुपयांची मर्यादा वाढवून आता दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीककर्ज माफ करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता ऑगस्ट महिन्यात जाहीर होणाऱ्या अधिकृत लाभार्थी याद्यांकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.