रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स... सतर्कतेने टळला मोठा अनर्थ

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
मुंबई
mumbai local train मध्य रेल्वेवरील उल्हासनगर–अंबरनाथ रेल्वे मार्गावर रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स अडकल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, कर्जत लोकलचे ट्रेन मॅनेजर (गार्ड) संतोष शांताराम जाधव यांच्या प्रसंगावधानामुळे हा संभाव्य अनर्थ टळला आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
 

major mumbai local train accident averted after train manager spots iron box on railway track 
नेरळ येथील रहिवासी असलेले संतोष जाधव हे कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन लोकल (गाडी क्र. TS-1, डिटेल क्र. 808) वर कर्तव्य बजावत होते. उल्हासनगर स्थानकातून गाडी सुटल्यानंतर उल्हासनगर आणि अंबरनाथ स्थानकादरम्यान (किमी 57/32) अचानक जोरदार धक्का बसला आणि मोठा आवाज झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जाधव यांनी तातडीने आपत्कालीन ब्रेक लावून गाडी थांबवली आणि इंटरकॉमद्वारे मोटरमन आर. एस. सैनी यांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर संतोष जाधव यांनी स्वतः खाली उतरून तपासणी केली. कोच क्रमांक 5360 C मधून प्रेशर गळतीचा आवाज येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लेडीज डब्यात तैनात होमगार्ड जवानासह मागील बाजूस पाहणी केली असता, किमी 57/32 ते 57/34 दरम्यान रेल्वे रुळावर मोठा लोखंडी चौकोनी बॉक्स अडकलेला असल्याचे आढळले.जाधव आणि होमगार्ड जवान यांनी तत्काळ तो बॉक्स रुळावरून हटवला. या कामामुळे रेल्वे वाहतूक सुमारे 10 ते 15 मिनिटे प्रभावित mumbai local train  झाली. त्यानंतर इमर्जन्सी कंट्रोल आणि ईएमयू कंट्रोलला घटनेची माहिती देण्यात आली. आवश्यक सुरक्षा तपासणीनंतर लोकलला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.सध्या उल्हासनगर–अंबरनाथ तसेच अंबरनाथ–बदलापूर दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा लोखंडी बॉक्स कामादरम्यान खाली पडला की तो कोणी जाणूनबुजून रुळावर ठेवला, याचा तपास रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे पोलीस करत आहेत.दरम्यान, संतोष जाधव यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे संभाव्य मोठा रेल्वे अपघात टळल्याने रेल्वे प्रशासन, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.