मुंबई
makrand anaspure मराठी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांसाठी छोट्या-छोट्या सरप्राईजेसची पेरणी करण्याची परंपरा कायम पाहायला मिळते. आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटातही असाच एक खास सरप्राईज दडलेला असून, अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा या चित्रपटातील भन्नाट कॅमिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अल्पकाळाच्या या भूमिकेतही त्यांनी आपल्या खास शैलीत प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.
या कॅमिओमधील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे मकरंद अनासपुरे यांच्या तोंडी असलेला एक हटके संवाद. या संवादाची रचना करताना त्यांच्या कारकिर्दीतील गाजलेल्या चित्रपटांच्या नावांची अत्यंत कल्पकपणे गुंफण करण्यात आली आहे. ‘उलाढाल’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘खबरदार’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नऊ महिने नऊ दिवस’, ‘गाढवाचं लग्न’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘तुक्या तुकविला नाग्या नाचविला’, ‘मला एक चान्स हवा’, ‘डावपेच’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘दे धक्का’, ‘दणक्यावर दणका’ आणि ‘साडे माडे ३’ या चित्रपटांच्या नावांचा या संवादात सहज आणि प्रभावी वापर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हा संवाद प्रथमदर्शनी एक साधा संवाद वाटतो. मात्र, तो बारकाईने ऐकल्यानंतर त्यामध्ये मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपटांची नावं एकामागोमाग एक गुंफलेली असल्याचे लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा प्रसंग एक सुखद आणि आगळावेगळा अनुभव ठरत आहे.दिग्दर्शक विजू माने यांनी मकरंद अनासपुरे यांच्या कारकिर्दीला दिलेली ही भन्नाट आणि कल्पक सलामी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. छोट्याशा कॅमिओमधून साकारलेली ही अनोखी कल्पना ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरप्राईजपैकी एक ठरत आहे.‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी लिहिले असून, कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.