अंतरवाली
manoj jarange patil मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. “मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. समाज एकवटला आहे, त्यामुळे आता काळजीपूर्वक पुढे जायचे आहे,” असे म्हणत त्यांनी २९ ऑगस्ट रोजी शेवटचे आणि निर्णायक आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अंतरवालीत आयोजित सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, २९ ऑगस्टला आंदोलनाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. “जर कोणी समाजाला वेड्यात काढत असेल, त्यामुळे तुम्हाला बोलावले आहे. सरकारने ५८ लाख नोंदींचे प्रमाणपत्र दिले नाही, त्यामुळे आता मोठे निर्णायक आंदोलन करायचे आहे,” असे त्यांनी म्हटले. ज्यांना आपल्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा समाजातील तरुणांचे हाल होत असल्याचा दावा करत जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू आहे. “समाजाच्या लेकरांसाठी शेवटचे निर्णायक आंदोलन करणार आहे. एकानेही घरी थांबायचे नाही. ५८ लाख नोंदींचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटायचे नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची मागणी करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “हैदराबाद गॅझेटियर दिले तर प्रमाणपत्र का दिले जात नाही? मराठ्यांना टार्गेट का केले जात आहे? आधी स्थानिक चौकशी अहवाल आणला,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जरांगे पाटील यांनी सरकारला २८ ऑगस्टपर्यंतची मुदत देत हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. “२९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू होईल. तोपर्यंत वेळ द्या. सर्वपक्षीय नेत्यांच्या मुलांनाही आरक्षणाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
“पाच गॅझेटियर आम्ही तीन वर्षांपासून स्वीकारण्याची मागणी करत आहोत, मात्र सरकार का निर्णय घेत नाही? मराठा समाजाच्या मुलांना का लक्ष्य केले जात आहे? श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी जात आहे,” अशी टीका त्यांनी केली. “२८ ऑगस्टपर्यंत निर्णय झाला नाही तर २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलन होईल. आम्हाला मारून आमच्यावरच केसेस दाखल केल्या जात आहेत. आता तुकडा पडल्याशिवाय थांबणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
आपल्या मागण्यांबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी उपोषण केल्यानंतर सरकारने ओबीसी सवलती लागू केल्याचा जीआर काढला, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. “उपसमितीच्या बैठका सुरू आहेत. ओबीसी सवलती लागू केल्या असतील तर संबंधित मंत्रालयाला सांगा,” असे ते म्हणाले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथीच्या योजना आणि मराठा समाजासाठीच्या योजनांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “अनेक मुलांनी वाहन घेतले, कर्जबाजारी झाले, त्यांना परतावा का दिला नाही? सारथीच्या योजना कागदावर सुरू आहेत. आमचा संयम तुटेल इतके समाजाला वेड्यात काढू नका,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणीही पुन्हा केली. “स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्यात सरकारला अडचण काय आहे? २९ ऑगस्टला मला कोण म्हणाले, त्यांची नावे सांगणार आहे. त्या ९ लोकांची नावे जाहीर करणार आहे,” असे जरांगे पाटील म्हणाले.
“सरकार कोणाचेही असो, आपल्या मुलांना अधिकारी बनवा. प्रत्येक पक्षाने मराठा समाजाचा आदेश मानला पाहिजे. २९ ऑगस्टला गावागावातून मराठे वाघासारखे मैदानात उतरतील,” असा दावा त्यांनी केला. तसेच, काही मंत्र्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप करत त्यांनी ओबीसी उपसमितीच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत, मग स्वतंत्र मंत्रालयाची गरज का नाही? त्यासाठी मंत्री अतुल सावे आहेत ना,” असेही त्यांनी म्हटले.