हर्षदा नाईक
memories of college days शालेय शिक्षण पूर्ण करून कनिष्ठ महाविद्यालयीन जगात प्रवेश केला. घराची परिस्थिति सर्व साधारण असल्याने अभ्यास केल्या शिवाय पर्याय नाही हे माहिती होते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी चांगले कॉलेज मिळाले तरच आपले पुढील करियर चांगले होऊ शकेल म्हणून कनिष्ठ महाविद्यालइन जीवनात जोमाने अभ्यास केला,आणि मुंबईमधील वरिष्ठ महाविद्यायत प्रवेश मिळवला. महाविद्यालयात जिवा भावाच्या मैत्रिणी मिळाल्या.
आमचा ७ जणींचा कॉलेज मधला ग्रुप जमला होता. पाच वर्षाच्या पदवी काळामध्ये आम्ही कधीच कोणाचा वाढदिवस टाळू दिला नाही. पण सर्व साधारण घरातल्या आम्ही होतो. परंतु आमचे वाढदिवस साजरे करायचे प्रकार पण साधे पण हटके होते. कधी सकाळी ७ वाजता असणारे लेक्चर बंक करून वरळी सी फेसला जात असू ,कधी फ्रँकी पार्टी करत असू तर कधी कोका फ्लोट पार्टी ( कोका-कोला मध्ये आईस क्रिम टाकून) करत असू, कधी सिद्धिविनायक मंदिरात जायचो तर कधी ब्रीच कँडी परिसरात.सकाळचं कॉलेज उरकून आम्ही सगळ्याच जणी निरनिराळ्या ठिकाणी पार्ट टाइम जॉब करत असायचो. महिन्याला २ हजार ५०० ते ३ हजार ५०० मिळायचे. त्याकाळात ते खूप होते. त्यावेळी रेल्वे पास १५० रुपयांमध्ये मिळायचा आणि महिना ५०० मध्ये मिळायचा. बाकी पैसे घरी दिले कि एक वेगळा आनंद व्हायचा. त्यातले थोडे पैसे घरात सांगून मला ठेवायचे.
मी भावंडाध्ये मोठी होते. त्यामुळे आईनंतर मीच हाच माझा रुबाब असायचा. माझी आई एका अभिनेत्रीचे उदाहरण देऊन मला म्हणायची बघ ती घरातली मोठी मुलगी कसं सगळं सांभाळते आणि तू नुसती उगाच मैत्रीण - मैत्रीण करत हिंडत असते. आज काय हिचा वाढदिवस तर आज काय तिच्या घरी पूजा. नुसता अभ्यासाच्या नावाखाली टाइम पास करते. मी सगळ्याला फक्त हो हो म्हणायचे आणि घरातील सर्व काम पटा पटा उरकायचे आणि कॉलेज, नोकरी आणि मग आम्ही मैत्रिणी भेटायचो.
पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना आम्ही ठरवलं की, ह्या वर्षी सर्वांचे वाढदिवस मोठ्या जोमाने करायचे . आमच्या ७ जणींपैकी तिघींचा वाढदिवस नव्हेंबरमध्ये येतो. एका छान हॉटेल मध्ये जेवण द्यायचं अस ठरलं. एका मोठ्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो.पदार्थांचे नाव खूप वेगळे होते. थोडं फार वाडप्याला विचारून पदार्थ मागवला. जेव्हा एक एक पदार्थ समोर यायला लागले तेव्हा समजलं की आपण काहीतरी वेगळेच पदार्थ मागवले आहेत. खाण झाल्यावर बिलाची वाट बघत असताना सर्वांच्या समोर स्टीलच्या वाटीत गरम पाणी आणि त्यात लिंबूची एक फोड आणून ठेवली . हा नक्की काय प्रकार आहे हे बघून आम्ही एकमेकांकडे बघत होतो. एक जण म्हणाली की, कदाचित फॉरेन मध्ये जेवल्यावर गरम लिंबू पाणी पीत असावेत लोक पचनासाठी.आमची शंका तेथील कर्मचाऱ्याने ओळखली आणि त्याने आम्हाला या गरम पाण्याचे कारण सांगितले. आम्ही त्या हॉटेल मधून बाहेर आल्यावर जे हसू लागलो. पुनः त्या हॉटेलमध्ये गेलोच नाही.शिक्षण पूर्ण झाल्यावर मी एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर होते. कामानिमित्त जगभर प्रवास केला. स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये जाण होत. त्यावेळी त्या प्रसंगाची आठवण झाली की हसायला येत. आज आम्ही मैत्रिणी आपापल्या क्षेत्रात मोठ्या पदांवर आहोत.
शैक्षणिक काळात आम्ही मैत्रिणींनी एकमेकींना खूप साथ दिली. सर्वांनी सुख, दुःख वाटून घेतली. ही साथ आजही आमच्या सोबत आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात आम्ही जूना विषय काढून एकमेकांशी गप्पा मारतो. मोजकेच जूने फोटो असले तरी मनात असणाऱ्या आमच्या आठवणींनी आम्हाला जगाची ओळख करून दिली.