सध्या २ हजार लिटर दुधाचे संकलन
वर्धा,
milk collection by goras bhandar वर्धेत गोरस भंडारवर कारवाई झाल्यानंतर गोरस भंडार प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाकडून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईला बेकायदेशीर मानत ७ जुलै रोजी गोरस भंडारच्या बाजूने निर्णय दिला. न्यायालयाने गोरस भंडारला उत्पादन व विक्री करायला परवानगी दिली. त्यानुसार आता गोरस भंडारच्या मुख्य केंद्रात दूध संकलनाला सुरुवात करण्यात आली असून सध्या २ हजार लिटर दूध संकलन होत असून हळूहळू यात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरातील गो संवर्धन गोरस भंडार ही स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्था आहे. या संस्थेच्या वतीने दूध संकलन व दूध विक्री यासह तूप, ब्रेड, पेढा, गोरस पाक ही उत्पादने बाजारात आणली गेली. गोरस पाक या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाला प्रचंड मागणी आहे. शहाराच्या जवळ असणार्या विविध गावातून गोपालक येथे दूध आणत होते. सकाळी साडेचार हजार आणि सायंकाळी साडेचार हजार लिटर दुधाचे संकलन येथे दररोज होते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाकडून अचानक कारवाई करण्यात आली. अस्वच्छतेचे कारण सांगून गोरस भंडार सील करण्यात आले. उत्पादन आणि विक्री बंद करण्यात आल्याने ग्राहक आणि गोपालक यांच्यात संभ्रम निर्माण झाले.
गोपालकांच्या हजारो लिटर दुधाला योग्य भाव मिळवून देणार्या गोरस भंडार बद्दल चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याने गोपालकांना ही बाब असह्य झाली. विविध सामाजिक संघटना, गांधीवादी आणि गोपालक गोरसच्या बाजूने रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकून संताप व्यक्त केला. या सर्व घडामोडीनंतर गोरस भंडार प्रशासन उच्च न्यायालयात गेले. ७ जुलै रोजी उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईला बेकायदेशीर ठरवत गोरस भंडार सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले. लवकरच गोरस भंडार सुरू होईल, अशीच अपेक्षा ग्राहक आणि गोपालकांना होती. पण, गोरस भंडारमध्ये दुरुस्तीची कामे सुरू असल्याने पुन्हा विलंब झाला. अखेर आता दूध संकलन सुरू करण्यात आले आहे.
९ लाखांच्या उत्पादित मालाची नासाडी
सुमारे दोन महिने गोरस भंडार बंद राहिले. जो माल गोरस भंडारमध्ये उत्पादित झाला होता तो तब्बल ९ लाख रुपयांचा तूप, गोरस पाक, ताक, दूध, ब्रेड यासारखी उत्पादने मुदतबाह्य झाल्याने फेकून द्यावी लागली.
ग्राहक व विविध संस्थांनी गोरस भंडाराला साथ दिली. त्याचा आम्हाला निश्चित फायदा झाला. आज गोरस भांडार सुरू झाले आहे. नमुन्याचा अहवाल निल आला आहे. आता हळू हळू गोरस भंडार पूर्व पदावर येईल, अशी अपेक्षा गो संवर्धन गोरस भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी व्यक्त केली.