पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई

13 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
दिल्ली
neet ug UG-NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत मंगळवारी दिल्लीतील विशेष न्यायालयात 13 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या या आरोपपत्रात राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मधील तीन प्रश्नपत्रिका तज्ज्ञ, पुणे आणि लातूरमधील कोचिंग क्लास संचालक, मालक, मध्यस्थ तसेच प्रश्नपत्रिका फुटीत सहभागी काही उमेदवारांचा समावेश आहे. हे सर्व 13 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
 

neet ug 2026 paper leak case: cbi files chargesheet against 13 accused 
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात आणि पुरावे नष्ट करणे यांसह भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्ग प्रतिबंध) कायदा 2024 अंतर्गत विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे.
नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी 12 मे रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली होती, तर 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेण्यात आली.या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह देशभरातील 92 ठिकाणी छापे टाकले. दोन महिन्यांच्या तपासात प्रश्नपत्रिका फुटीची संपूर्ण साखळी उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींमधील संबंध, आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका फुटीची पद्धत आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका याचा सखोल तपास सीबीआयने केला.
 
 
दाखल करण्यात आलेल्या neet ug UG-NEET आरोपपत्रात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतील तीन विषयतज्ज्ञांचा समावेश आहे. यामध्ये भौतिकशास्त्र विषयातील मनीषा संजय हवालदार, जीवशास्त्र विषयातील मनीषा गुरुनाथ मांढरे आणि रसायनशास्त्र विषयातील पी. व्ही. कुलकर्णी यांचा समावेश आहे.याशिवाय लातूरमधील डॉ. मनोज शिरुरे, पुण्यातील डॉ. अभंग प्रभू, शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह, लातूरमधील कोचिंग क्लास संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्यासह यश यादव, मांगीलाल बिवल, दिनेश बिवल, विकास बिवल, शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे अशा एकूण 13 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.सीबीआयने पुणे, लातूर, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीसह विविध राज्यांमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली होती. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून आरोपींची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. तपासात परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.या आरोपींनी नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटवून देशभरातील विद्यार्थ्यांना आर्थिक हितसंबंधातून ती उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर येथे क्रांतिकारी जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आले होते. 35 दिवसांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास अद्याप सुरू आहे.