प्रगती करंबेळकर
marathi theatre रिल्स आणि तंत्रज्ञानात अडकलेली तरुण पिढी रंगभूमीपासून दूर जाईल, अशी भीती कलाक्षेत्रातून अनेकदा व्यक्त होत असते. मात्र काळानुरूप बदल स्वीकारत मराठी रंगभूमीने तरुणाईशी नवे नाते जोडले आहे. तरुणांच्या नात्यांमधील गुंतागुंत, तंत्रज्ञानाचा जीवनावर होणारा परिणाम, मानसिकता, बदलती जीवनशैली आणि समकालीन सामाजिक वास्तव यांसारखे विषय नाटकांमधून मांडले जात असल्याने मराठी रंगभूमीवर तरुण पिढीला भावणाऱ्या विषयांची नवी पर्वणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जुन्या गाजलेल्या साहित्यकृतींना आधुनिक रंगमंचीय रूप देत नव्या पिढीला मराठी साहित्य आणि रंगभूमीच्या समृद्ध परंपरेशी जोडण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
सध्या रंगभूमीवर सादर होत असलेल्या आमच्या पिढीची गोष्टच वेगळी, चिरंजीव परफेक्ट बिघडलाय, जर तर ची गोष्ट यांसारख्या नाटकांमधून तरुण पिढीच्या अनुभवविश्वाला थेट हात घातला जात आहे. आजच्या तरुणांचे बदलते नातेसंबंध, त्यांच्यातील संवादाचा अभाव, अपेक्षा, करिअरची धडपड, तंत्रज्ञानामुळे बदलणारे मानवी संबंध आणि स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया या विषयांचे प्रतिबिंब या नाटकांमध्ये दिसते. त्यामुळे रंगमंचावर सादर होणाऱ्या व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे तरुणांना दूरचे किंवा काल्पनिक वाटत नाहीत, तर त्यांना स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंब त्यात दिसते.
मराठी रंगभूमीच्या या बदलत्या प्रवाहातील महत्त्वाची बाब म्हणजे नव्या विषयांसोबतच जुन्या साहित्यकृतींचे नव्याने पुनरुज्जीवन. लोकप्रिय साहित्यकृतींची मांडणी केवळ जुन्या पिढीपुरती मर्यादित न ठेवता आधुनिक रंगभाषा, संगीत, नेपथ्य आणि सादरीकरणाच्या माध्यमातून ती तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहे. नुकतेच मराठी साहित्यविश्वातील अजरामर साहित्यकृती बटाट्याची चाळमधील पु. ल. देशपांडे यांच्या एक संगीतक या संकल्पनेला नव्या रंगमंचीय रूपात सादर करण्याचा प्रयत्न या इथे चाळ बटाट्याची या भव्य मराठी संगीतिकेतून करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिरात १ ऑगस्ट रोजी या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. अशा प्रयोगांमधून जुन्या साहित्याचा गाभा कायम ठेवत त्याला समकालीन सादरीकरणाची जोड दिली जात आहे. या प्रक्रियेतून संगीत नाटकांसारख्या पारंपरिक रंगप्रकारांकडेही तरुण पिढीला आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. आजच्या तरुणांना पारंपरिक कला आणि आधुनिक मनोरंजन यांच्यात निवड करावी लागू नये, तर दोन्हींचा अनुभव घेता यावा, यासाठी रंगकर्मी नव्या प्रयोगांचा आधार घेत आहेत. जुन्या आशयाला नवी मांडणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि गतिमान सादरीकरण यामुळे पारंपरिक नाट्यप्रकारही नव्या प्रेक्षकांसाठी अधिक सुलभ होत आहेत.
तरुण पिढी रिल्समध्ये marathi theatre अडकलेली आहे, असा सर्वसाधारण समज असला तरी प्रत्यक्षात ही पिढी चांगल्या आशयाला प्रतिसाद देत असल्याचे रंगभूमीवरील वाढता प्रेक्षकवर्ग दाखवून देतो. मात्र या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी नाटकांच्या प्रचारपद्धतीतही बदल झाला आहे. नाटकांचे मार्केटिंग आता केवळ वर्तमानपत्रातील जाहिराती किंवा पोस्टर्सपुरते मर्यादित राहिलेले नाही. नाटकातील संवाद, प्रसंग, कलाकारांचे व्हिडीओ आणि पडद्यामागील क्षण रिल्सच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. त्यामुळे नाटकाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होते.