नवी दिल्ली,
Pakistan defeated again आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा (WTC) २०२५-२७ मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा ९० धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता आणखी कमी झाली असून संघ गुणतालिकेत नवव्या आणि अखेरच्या स्थानावर घसरला आहे.२११ धावांचे माफक लक्ष्य समोर असतानाही पाकिस्तानचा संपूर्ण डाव केवळ १२० धावांत आटोपला. बाबर आझमने एकाकी झुंज देत नाबाद ५८ धावांची खेळी केली. त्याने नऊ चौकारही लगावले. मात्र, इतर फलंदाजांनी निराशा केली. अझान अवैस आणि इमाम-उल-हक यांनी प्रत्येकी तीन धावा केल्या, मोहम्मद रिझवान ११ धावांवर बाद झाला, तर सलमान अली आगा आणि आमिर जमाल यांना खातेही उघडता आले नाही. अखेरच्या फळीतील मोहम्मद अब्बासने बाबरसोबत ४९ धावांची भागीदारी करत संघाला १०० धावांचा टप्पा पार करून दिला.

या पराभवानंतर पाकिस्तानने WTC २०२५-२७ स्पर्धेत पाच सामने खेळले असून त्यापैकी केवळ एक विजय मिळवला आहे, तर चार सामने गमावले आहेत. संघाच्या खात्यात चार गुण असून विजयाची टक्केवारी ६.६७ इतकी आहे. त्यामुळे पाकिस्तान गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून अंतिम फेरीची शर्यत त्यांच्यासाठी जवळपास संपुष्टात आली आहे.वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला असला तरी त्यांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यता फारशा मजबूत नाहीत. त्यांनी आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यापैकी सात सामने गमावले, दोन जिंकले आहेत. त्यामुळे विंडीज संघ आठव्या स्थानावर आहे.
भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत नऊ कसोटी सामने खेळले असून चार सामने जिंकले, चार गमावले, तर इंग्लंडविरुद्धचा एक सामना अनिर्णित राहिला आहे. या कामगिरीच्या जोरावर भारत WTC गुणतालिकेत पाचव्या स्थानावर कायम आहे.गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी असून त्यांनी आठपैकी सात सामने जिंकले आहेत. गतविजेता दक्षिण आफ्रिका चारपैकी तीन विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असून अंतिम फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.