अग्रलेख,
laxmanrao-joshi : महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवन गौरव सन्मानाचे मानकरी, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनामुळे मागील पिढीतील माहितीचा कोष असलेला खंदा पत्रकार हरपला आहे. पत्रकारितेचा आधारवड कोसळला आहे. आपल्या आयुष्यातील जवळजवळ सात दशके त्यांनी पत्रकारितेत घालवली. त्यांच्या निधनाने सव्यसाची पत्रकारितेच्या एका युगाचा अस्त झाला आहे. वास्तविक लक्ष्मणरावांची पत्रकारिता सुरू झाली तेव्हाचा काळ हाताने बातम्या लिहिण्याचा होता. त्या कालखंडात उपसंपादक-वार्ताहर पदापासून प्रारंभ करत त्यांनी तरुण भारतचे मुख्य संपादकपद आणि तरुण भारतचे प्रकाशन करणाऱ्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे प्रबंध संचालकपदही भूषविले होते. ते वयोमानाप्रमाणे निवृत्त झाले आणि त्यानंतर पत्रकारितेत संगणक युगाचा प्रारंभ झाला. पण निवृत्त झाल्यावरही लक्ष्मणरावांनी ज्या पद्धतीने या नवीन युगावर स्वतःची जबर मांड ठोकली, ते अनोखेच होते. निवृत्त झाल्यावर ते संगणकावर आणि मोबाईलवरही आपला मजकूर स्वतः टंकमुद्रित करून सर्वत्र पाठवित असत.
लक्ष्मणरावांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत करारी होते. पत्रकारितेच्या इतिहासात लक्ष्मणराव जोशींच्या नावाने एक घटना नोंदविली गेली आहे. ती अशी की, मनोरमा कांबळे प्रकरणात एका नेत्याने घेतलेली पत्रकार परिषद सर्व दैनिकांनी प्रकाशित केली. त्यात त्यांनी न्यायपालिकेला दोष दिला. ती बातमी प्रकाशित केल्याने कोर्टाचा अवमान झाल्याचा मुद्दा पुढे आला. त्या प्रकरणात त्या नेत्याने आणि इतर संपादकांनी माफी मागवून स्वतःला मोकळे करून घेतले. लक्ष्मणरावांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. त्या नेत्याचे वक्तव्य आपण प्रकाशित केले यात आपला कोणताही दोष नाही, असे त्यांचे म्हणणे होते. अवमानाच्या प्रकरणात सत्य हा बचाव असू शकत नाही, या मुद्यावर कोर्ट उठेपर्यंत लक्ष्मणरावांना शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांनी ती भोगली. असे होते लक्ष्मणराव!
लक्ष्मणराव मूळचे पाथर्डीचे. त्यांचे वडील त्र्यंबकराव भिक्षुकी करीत. त्यातूनच ते तेल्हारा येथे आले. तेल्हारा येथे त्यांचे शिक्षण झाले. खेडेगावातील भिक्षुकाच्या घरात त्या काळात अठरा विश्वे दारिद्र्याशिवाय काय असेल? लक्ष्मणरावांनी मॅट्रिक होईपर्यंत पायात चप्पलही घातली नव्हती. त्याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गारुड त्यांच्यावर झाले आणि ते स्वयंसेवक झाले. स्वयंसेवक, गटनायक, शिक्षक, मुख्य शिक्षक, कार्यवाह या विविध जबाबदाऱ्या सांभाळीत काम करू लागले. चांगली संधी मिळावी म्हणून ते अकोला येथे गेले आणि तेथील भिकमचंद खंडेलवाल विद्यालयात शिक्षक म्हणून काम करू लागले. काही काळाने संघ कार्याव्यतिरिक्त ते ‘मातृभूमी’ या दैनिकातही काम करू लागले. शांताराम सरदेशपांडे हे पत्रकारितेतील त्यांचे प्रारंभिक गुरू. अकोला येथे असताना त्यांनी संघाचे प्रथम आणि द्वितीय वर्ष पूर्ण केले होते. संघ व्यवस्थेतूनच ते नागपूरच्या तरुण भारतात उपसंपादक म्हणून रुजू झाले.
नुकतेच लग्न झालेले लक्ष्मणराव परिवार घेऊन नागपुरात आले होते. त्यापूर्वी त्यांनी नागपूर बघितलेही नव्हते. साधी सायकल देखील त्यांच्याजवळ नव्हती. पण काही काळातच त्यांनी नागपुरात आपला जम बसविला. बर्डीवरील संगम चाळीत बाळासाहेब देवरस यांचे घर होते. तिथे प्रदीर्घकाळ त्यांचे वास्तव्य होते. पुढे ते तरुण भारताचे मुख्य वार्ताहर झाले आणि खाजगीरीत्या त्यांनी राज्यशास्त्रात एम.ए. केले. एका अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली आणि ते विकसनशील पत्रकारिता या विषयात प्रयोग करणारे विदर्भातले पहिले पत्रकार ठरले. पेंच प्रकल्पाचा बदलता चेहरामोहरा ही त्यांची मालिका महाराष्ट्रभर गाजली. एखाद्या प्रकल्पाच्या प्रारंभबिंदूपासून तो प्रकल्प पूर्णत्वाला जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे आणि ती मालिका पाच-सहा वर्षे चालविणे हे त्यांच्या विकासविषयक पत्रकारितेचे वैशिष्ट्य होते. विदर्भ-मराठवाड्यातील सिंचनाच्या विषयात ते तज्ज्ञ मानले जात. मा. गो. वैद्य आणि मामासाहेब घुमरे यासारख्या पत्रकारितेतील दोन दिग्गज गुरूंनी त्यांच्या पत्रकारितेला पैलू पाडले.
स्वभावाने लक्ष्मणराव जरासे शीघ्रकोपी होते. शांत झाल्यावर मात्र एखाद्या लहान मुलासारखा निरागस भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसे. आपली चूक झाली किंवा आपण एखाद्यावर उगाच रागावलो तर एखाद्या कनिष्ठ सहकाऱ्याचीही माफी मागायला त्यांना कधी कमीपणा वाटला नाही. वरिष्ठ म्हणून सहकाऱ्यांकडून काम करवून घेताना ते सहकाऱ्यांना पूर्ण मोकळेपणा देत असत. कुठेही वृत्त संकलनाला पाठवत, पण तो परत येईपर्यंत त्याची काळजी करीत असत. त्यांच्या काळात त्यांनी काँग्रेस, भाजपा या पक्षांची राष्ट्रीय अधिवेशने व महत्त्वाच्या घटना झाल्या तेथे वृत्त संकलनासाठी तरुण भारतच्या पत्रकारांना पाठविणे सुरू केले. भोपाळ गॅस कांड, पाटणा भूकंप, लातूर भूकंप, अयोध्या राम जन्मभूमी आंदोलन या ठिकाणी तरुण भारतचे प्रतिनिधी पाठविणे सुरू झाले. ते स्वतः आसाममधील विद्यार्थी आंदोलनाचा आढावा घ्यायला आसाममध्ये गेले होते. त्यामुळे अनेक आसामी विद्यार्थी नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. आसाम विद्यार्थी आंदोलनावरही त्यांनी पुस्तक लिहिले होते. पंजाबमधील अतिरेकी कारवायांबाबतत्यांनी वृत्तमालिका चालवली होती. तरुण भारतमध्ये काम करत असताना त्यांचा वनवासी कल्याण आश्रमाशी संबंध आला आणि त्यातून वन योगी हे बाळासाहेब देशपांडे यांच्यावरील त्यांचे पुस्तक साकार झाले.
सर्वांना बरोबर घेऊन चालणे हे त्यांना संघ स्वयंसेवक आणि शिक्षक असल्याने चांगले जमत होते. सर्व सहकाऱ्यांच्या घरी ते जात आणि त्यांच्या सुखदुःखात वाटेकरी होत. सहकाऱ्यांना पुढे होण्यासाठी प्रोत्साहन देत आणि कुणी चुकला तर त्याला पाठीशी घालून अपयश आणि दोष स्वतःकडे घेणे हेही त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. जबाबदारी कोणतीही असो, कामात कमी न पडणे ही त्यांच्या कर्तृत्वशैलीची विशेषता होती. त्यामुळेच वसंत नगर पत्रकार कॉलनीत तरुण भारतमधील पाच-सहा जणांना घरे मिळाली. संघटक म्हणून त्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते पत्रकार संघटनेचे काम करत आणि प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असत. तरुण भारतचे वृत्तसंपादक असतानाही ते पडेल ती जबाबदारी स्वीकारत असत. त्यामुळेच ते वृत्त संपादक पदावरून थेट मुख्य संपादक आणि नंतर काही काळ प्रबंध संचालकही झालेत.
तरुण भारतच्या मुख्य संपादकपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांच्या जीवनातील दुसरी इनिंग सुरू झाली. ‘गोमंतक’ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून ते काम करू लागले. पुढे त्यांनी ‘गोवादूत’मध्ये काम केले. जवळजवळ १० वर्षे ते गोव्यात होते. त्यानंतर मुंबई तरुण भारत, जळगाव तरुण भारत येथे मुख्य संपादक म्हणून ते कार्यरत होते. जळगाव तरुण भारतमधून निवृत्त झाल्यावर त्यांना घरी बसवत नव्हते म्हणून त्यांनी ‘लोकशाही वार्ता’ या नव्या वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. या वृत्तपत्रात असतानाच त्यांचा ७५ वा वाढदिवस भव्य प्रमाणात साजरा झाला. वयाच्या ८० व्या वर्षानंतर त्यांनी वृत्तपत्रात सेवा देणे बंद केले. मात्र फेसबुक, ट्विटर या सर्व माध्यमांतून ते अगदी आत्तापर्यंत त्यांचे अस्तित्व जाणवायचे. रा. सू. गवई यांच्यावरील ‘अजातशत्रू’ या ग्रंथाचे संपादन करणाऱ्या संपादक मंडळात त्यांचा समावेश होता. तसेच ‘पांचजन्य’ या हिंदी साप्ताहिकातर्फे त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दोन दिग्गजांच्या हस्ते भव्य समारंभात देण्यात आला होता.
कुठल्याही परिस्थितीत मनाची स्थिरता, संयम आणि सद्सद्विवेक कसा कायम राखावा हे त्यांच्याकडून शिकता येणारे होते. तर्कशुद्ध मांडणी हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. कुठल्याही वयात नवीन माध्यम आपलेसे करून त्यात व्यक्त होण्याची वृत्ती होती. काळाबरोबर चालणारा, सम्यक दृष्टीचा मार्गदर्शक म्हणूनही नवीन पिढी त्यांना ओळखत असे. पत्रकारितेतील एक दीपस्तंभ आणि एक सबळ आधारवड नवीन पिढीला सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. त्यांना तरुण भारत परिवार आणि श्री नरकेसरी प्रकाशनातर्फे भावपूर्ण आदरांजली.