laxmanrao-joshi : गेल्या आठवड्यातच फोन आला. मला वाटले नेहमीसारखे कोणत्यातरी राजकीय विषयावर चर्चा करण्यासाठी असेल. पण, तिकडून लक्ष्मणरावांचा आवाज आला, ‘मी गोव्यात अडकलो आहे आणि मला आता तुम्हीच बाहेर काढू शकता. तत्काळ गोवा पोलिसांना फोन करा आणि मला मदत करायला सांगा.’ मी त्यांना लगेच तुमचे लोकेशन द्या, नेमक्या कोणत्या संकटात आहात, अशी विचारपूस केली. ‘बाहेर खूप पाणी साचले आहे आणि आम्ही एका इमारतीत अडकलो आहोत...’ लक्ष्मणराव सांगत होते. मला खरेच वाटले. कारण त्यादिवशी पाऊस खूप होता. आणखी विचारपूस केली, तर नागपूर विमानतळ आणि सहकारनगर असा उल्लेख ते करीत होते. मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण, एक कणखर आणि बाणेदार आवाज ऐकण्याचीच लक्ष्मणरावांच्या बाबतीत सवय लागली होती. हललेले लक्ष्मणराव कधी ऐकलेच नाहीत. पण, नंतर लक्षात आले, आयुष्यात जगलेल्या एका मोठ्या कालखंडांची मेंदू वयाच्या नव्वदीत उजळणी करतो, तसेच काहीसे ते होते. ते संकटात नसल्याची खात्री करून घेतली आणि लगेच सुधीरजी पाठक यांना फोन केला. त्यांनी योग्य ती माहिती दिली.

मी १९ वर्षांचा असेन. लक्ष्मणरावांसोबत एका बैठकीत होतो. ‘वाचकांच्या मनोगत’साठी काही पत्र त्यांच्या हाती दिली आणि त्यांनी लगेच ‘तरुण भारता’त जॉईन होता का, अशी थेट विचारणा केली. पहिलीच भेट होती आणि थेट ही विचारणा! तेथून जे ‘बाँडिंग’ तयार झाले ते अगदी गेल्या आठवड्यापर्यंत कायम होते. साधारणत: ३५ वर्षांचा परिचय. मला पत्रकारितेत घडविणारी जी महनीय नावे, त्यातील लक्ष्मणराव हे अग्रणी. त्यांचा आशीर्वाद आजतागायत कायम पाठीशी राहिला. तो काळ फार गंभीर पत्रकारितेचा होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची पत्रपरिषद नागपूरच्या राजभवनात होणार होती. पंतप्रधानांची पत्रपरिषद कव्हर करायला कोण जाईल, यावर चक्क ऑफिसमध्ये मिटिंग झाली होती आणि ती संधी त्यांनी मला दिली.
आयुष्यात रागावले अनेकदा. पण, तितकेच प्रेमही केले... सतत चांगलेच झाले पाहिजे, हा आग्रह त्यांच्याकडूनच शिकायला मिळाला. खूप कठोर परिश्रम करून घेतले. पण, तितकेच चांगले शिकवलेही... जबाबदाऱ्या खूप टाकल्या; त्यातून कामात पक्के करत गेले. क्रिकेटवर प्रचंड प्रेम करायचे. रात्री २ वाजता मॅच संपली की आवर्जून बातमी कशी गेली पाहिजे, यावर फोन करून सांगायचे. पत्रकारितेव्यतिरिक्त क्रिकेट हा त्यांचा एकमेव व्यासंग होता. एकदा सामनाविरोधात त्यांनी लेख लिहिला, तेव्हा ‘फायटिंग विथ टायगर’ अशी ‘आऊटलूक’ने त्यावेळी स्टोरी केली होती. मनोरमा कांबळे बलात्कार प्रकरणात जी ठाम भूमिका घेतली, तेव्हा आपल्या बातमीदारासाठी प्रसंगी कोर्टाच्या अवमानाची शिक्षाही भोगली. (बबनराव वाळके हे तेव्हा बातमीदार होते. आज तेही हयात नाहीत) अजूनही आठवते, प्रा. जोगेंद्र कवाडे सरांनी त्यांना मिरवणुकीतून ऑफिसपर्यंत आणले होते. गोसे खुर्दवर सातत्याने लिखाण केले. सातत्याने वाचनाचा आग्रह ते सतत करीत. त्यावेळी देशभरातील इंग्रजी वर्तमानपत्र ३-४ दिवसांनी नागपूरला यायचे. पण, त्याचे वाचन सक्तीचे असे.
लक्ष्मणराव हे खऱ्या अर्थाने पत्रकार घडविणारे विद्यापीठ होते. ग्रामीण भागातून त्यांनी कित्येकांना पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणले. पत्रकारिता आणि लेखन हेच जीवनध्येय असलेल्या आणि ते क्षणोक्षणी जगलेल्या एका महान तपस्वी व्यक्तिमत्त्वाला आज गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण मुकलो.
लक्ष्मणरावांना भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांति
केतन पाठक
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी