इस्लामाबाद,
Protesters in PoK enemy as India पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलकांवर झालेल्या कारवाईचे समर्थन करताना त्यांनी इस्लामाबादविरोधात आंदोलन करणाऱ्यांना भारताप्रमाणेच पाकिस्तानचे शत्रू असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पीओकेतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ख्वाजा आसिफ यांनी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. आंदोलकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद होणार नसल्याचे स्पष्ट करत, भारत आणि पीओकेतील आंदोलक यांच्यात कोणताही फरक नसल्याचे त्यांनी म्हटले. सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेल्यांना पाकिस्तानचे शत्रू मानले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बंदी घालण्यात आलेल्या जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी (JAAC)च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चावर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केल्यानंतर आसिफ यांचे हे वक्तव्य समोर आले. या गोळीबारात अनेक जणांचा मृत्यू झाला असून, अलिकडच्या काळातील पीओकेमधील ही सर्वात गंभीर घटनांपैकी एक मानली जात आहे.काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव असलेल्या विधानसभेच्या १२ जागा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सुमारे ५ हजार जेएएसी समर्थकांनी रावलकोट ते मुझफ्फराबाद असा मोर्चा काढला होता. जेएएसीचा आरोप आहे की, या राखीव जागांमुळे पीओकेमधील नागरिकांचे राजकीय अधिकार कमकुवत होत असून, इस्लामाबादस्थित राजकीय पक्षांना सरकार स्थापनेवर प्रभाव टाकण्याची संधी मिळते. त्यामुळे केवळ पीओकेमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनाच विधानसभा निवडण्याचा अधिकार असावा, अशी त्यांची मागणी आहे.
जेएएसीच्या दाव्यानुसार, शांततापूर्ण मोर्चादरम्यान सुरक्षा दलांनी गोळीबार केला. या कारवाईत त्यांच्या किमान १४ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दोन डझनांहून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जेएएसीचे संस्थापक सदस्य उमर नझीर यांचे धाकटे बंधू उस्मान नझीर यांचाही समावेश आहे.पीओकेमध्ये गेल्या अनेक आठवड्यांपासून आंदोलन सुरू असून परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. विविध वृत्तांनुसार, ५ जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनांमध्ये आणि त्यानंतर झालेल्या कारवाईत ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी ३४ आंदोलक आणि सहा सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एकूण ४० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.