राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर

अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
दिल्ली
rajya sabha राज्यसभेने विरोधी पक्षांच्या गदारोळात ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ मंजूर केले असून, या सुधारणेमुळे ‘वंदे मातरम’ला कायदेशीर संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. नव्या तरतुदींनुसार, ‘वंदे मातरम’चा जाणूनबुजून अपमान करणे, ते गाण्यास हेतुपुरस्सर अडथळा आणणे किंवा राष्ट्रीय सन्मानास कमीपणा आणणारे कोणतेही कृत्य आता फौजदारी गुन्हा मानले जाणार आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कमाल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची, दंडाची किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे.
 

rajya sabha passes vande mataram protection bill 2026 with up to 3 years jail for insult 
या सुधारणा विधेयकामुळे ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१’ची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत या कायद्यांतर्गत राष्ट्रध्वज, संविधान आणि ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण होते. नव्या सुधारणेनंतर ‘वंदे मातरम’चाही या संरक्षणाच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे. सरकारने राष्ट्रीय सन्मानाशी संबंधित प्रतीकांना अधिक प्रभावी कायदेशीर संरक्षण देणे हा या सुधारणेचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे.
विधेयकानुसार, ‘वंदे मातरम’ गाण्यास हेतुपुरस्सर प्रतिबंध करणे, त्यात अडथळा निर्माण करणे किंवा त्याचा अपमान करणे हे शिक्षापात्र कृत्य ठरणार आहे. ‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असताना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, या विधेयकावरील rajya sabha चर्चेदरम्यान राज्यसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दुपारचे सत्र सुरू होताच दिल्लीतील नीट पेपरफुटीच्या आंदोलकांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. उपसभापती हरिवंश यांनी आंदोलन करणाऱ्या सदस्यांना सभागृहाची शिस्त आणि सभ्यता राखण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही विरोधकांचे आंदोलन सुरूच राहिले. गदारोळाच्या वातावरणातही उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज सुरू ठेवत विधेयकावरील चर्चा चालू ठेवली. नंतर केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले विधेयकावर आपले मत मांडत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
याच पार्श्वभूमीवर लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांवर गोळीबाराचे आदेश त्यांनीच दिल्याचा दावा केला. दरम्यान, नीट फेरपरीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणीही नवा वाद निर्माण झाला असून, रोहित पवार यांनी फेरपरीक्षेचा प्रश्नपत्रिकाही तीन दिवस आधी फुटल्याचा दावा करत या प्रकरणात ‘गुजरात कनेक्शन’ असल्याचा आरोप केला आहे.
नव्या कायद्यामुळे राष्ट्रध्वज, संविधान आणि ‘जन गण मन’प्रमाणेच ‘वंदे मातरम’लाही कायदेशीर संरक्षण प्राप्त होणार असून, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करणाऱ्या कृत्यांविरोधात अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.