गुवाहाटी,
Rampage of floods in Assam आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून, गेल्या २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाल्याने यंदाच्या मान्सून हंगामातील मृतांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये अजूनही पूराचे संकट कायम असून सुमारे ३.३२ लाख नागरिक त्याचा फटका सहन करत आहेत. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी सानुग्रह मदत ९ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून नुकसानभरपाईचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत.शिवसागर, गोलाघाट, जोरहाट, चराईदेव, नागाव, सोनितपूर आणि कामरूप महानगर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. राज्यातील २१ महसूल मंडळांतील ६२२ गावे पुराच्या पाण्याखाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूराचा सर्वाधिक फटका चराईदेव जिल्ह्याला बसला असून तेथे १.४२ लाख नागरिक बाधित झाले आहेत. त्याखालोखाल शिवसागरमध्ये ९७,०७४ तर जोरहाटमध्ये ५७,३७१ नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. मंगळवारी शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा महसूल मंडळात सात जणांचा मृत्यू झाला असून, यामुळे राज्यातील पुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७५ झाली आहे.पूरग्रस्तांसाठी राज्यभरात ८१ मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून त्यामध्ये ३२,४७७ विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. याशिवाय ३४ मदत वितरण केंद्रांमार्फत आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे. लष्कर, भारतीय हवाई दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, आपत्कालीन सेवा आणि स्वयंसेवक बचाव व मदतकार्यात सातत्याने कार्यरत आहेत.
पुरामुळे ४५,३४१ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसागर जिल्ह्यातील नागरिकांना संपर्काची अडचण येऊ नये म्हणून 'इंट्रा-सर्कल रोमिंग' सुविधा ३० जुलै रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत किंवा पुढील आदेश मिळेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिम ता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगितले. दरम्यान, राज्यातील विविध भागांतील समोर आलेल्या चित्रांमध्ये रस्ते आणि घरे पाण्याखाली गेल्याचे दिसत असून अनेक नागरिकांना सायकली खांद्यावर घेऊन किंवा पाण्यातून मार्ग काढत सुरक्षित ठिकाणी जावे लागत आहे.