नवी दिल्ली,
Rijiju's warning to Rahul Gandhi लोकसभेत कागदगळतीविरोधी विधेयकावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश अमित शाह यांनी दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या वक्तव्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र आक्षेप घेत राहुल गांधी यांनी सभागृहात माफी मागावी किंवा आपल्या आरोपांचे पुरावे सादर करावेत, अशी मागणी केली. भाषणात राहुल गांधी यांनी गृहमंत्री सभागृहात अनुपस्थित असल्याचा उल्लेख करत आंदोलक विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईसाठी त्यांनाच जबाबदार धरले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

या वादात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुल गांधींची बाजू घेत सरकारने आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी केली. त्यावर किरेन रिजिजू यांनी चौकशीची मागणी वेगळी बाब असली तरी कोणत्याही पुराव्याशिवाय गृहमंत्र्यांवर थेट आरोप करणे अयोग्य असल्याचे सांगत राहुल गांधींनी माफी मागण्याचा आग्रह धरला. सभागृहातील वातावरण तापत असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना विधेयकावरील चर्चेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. त्यांनी वैयक्तिक आरोप टाळण्याच्या सूचना देत नियमांच्या चौकटीत चर्चा करण्यावर भर दिला.