तभा वृत्तसेवा
वणी,
wani-assembly-constituency : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत वणी विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. आतापर्यंत 86.73 टक्के एसआयआर अर्जांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून, प्रशासनाने मतदार यादी अद्ययावतीकरण प्रक्रियेला वेग दिला आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 79 हजार मतदार असून, त्यापैकी 2 लाख 78 हजार 572 (99.5 टक्के) मतदारांपर्यंत गणना अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. या अर्जांपैकी 2 लाख 42 हजार 811 चे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून, हे प्रमाण 86.73 टक्के आहे. उर्वरित 24 हजार 674 फॉर्म्सचे व्हेरिफिकेशन व डिजिटलायझेशनचे काम बीएलओमार्फत सुरू आहे.
मतदारसंघात 4,327 मतदार मृत, 376 मतदार गैरहजर, 6,505 कायमस्वरूपी स्थलांतरित, 1,245 मतदारांची दुबार नोंद, तर 33 मतदार इतर कारणांमुळे असंबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा एकूण 12 हजार 486 मतदारांचे प्रमाण 4.46 टक्के आहे.
30 जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांकडून अर्ज भरून घेत आहेत. भरलेले अर्ज तत्काळ आभासी प्रणालीद्वारे नोंदवून त्यांचे डिजिटलायझेशन केले जात असल्याने संपूर्ण प्रक्रिया वेळेत व पारदर्शकपणे पूर्ण होत आहे. नागरिकांकडूनही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळे वणी विधानसभा मतदारसंघाने राज्य व जिल्हास्तरावर दुसरे स्थान मिळविले असून, लवकरात लवकर 100 टक्के डिजिटलायझेशनचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे.
मतदार नोंदणी अधिकारी नितीन हिंगोले यांनी, ज्या मतदारांपर्यंत बीएलओ अद्याप पोचले नाहीत, त्यांच्यासाठी तालुक्यात हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी बीएलओशी संपर्क साधून अथवा हेल्प डेस्कवर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून एसआयआर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.