मुंबई,
TET question paper leaked महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. तपासादरम्यान टीईटीच्या प्रश्नपत्रिका छापण्यात आलेल्या आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये सुरक्षेच्या गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच त्रुटींचा फायदा घेत प्रश्नपत्रिका छापखान्यातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.तपासानुसार, दिल्लीस्थित 'माहीम पेपर्स लिमिटेड'च्या आग्रा युनिटमध्ये अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षण विभागाच्या परीक्षांसह देशातील विविध गोपनीय परीक्षांच्या प्रश्नपत्रिका छापल्या जात होत्या. मात्र, संवेदनशील विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण नसणे आणि तपासणीतील निष्काळजीपणामुळे प्रश्नपत्रिका बाहेर नेणे शक्य झाल्याचे समोर आले आहे.
एसआयटीच्या माहितीनुसार, कंपनीचे कर्मचारी बाबूलाल कुशवाहा आणि नरेश महावर उर्फ निक्की यांनी टीईटीच्या प्रश्नपत्रिका छपाई केंद्रातून बाहेर काढून त्या कंपनीचा माजी कर्मचारी सोनू कुमार दिवाकर याच्याकडे सुपूर्द केल्या. सोनूने या प्रश्नपत्रिकांच्या छायाप्रती तयार करून मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या सांगण्यावरून त्या महाराष्ट्रातील इतर आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.या प्रकरणात सोमवारी भिवंडी न्यायालयात आत्मसमर्पण केलेल्या सोनू कुमार दिवाकरला एसआयटीने अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, पुढील चौकशीसाठी २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, २०१८ मध्ये माहीम पेपर्स लिमिटेडमधील नोकरी सोडल्यानंतरही सोनूचा मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याच्याशी सातत्याने संपर्क होता. या दोघांनी मिळून पेपरफुटीचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
दरम्यान, पुण्यातून फरार असलेल्या संशयितांपैकी एक जण महाराष्ट्र सरकारच्या एका विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याचेही एसआयटीने उघड केले आहे. त्याने फुटलेली प्रश्नपत्रिका मिळविण्यात रस दाखवला होता आणि तो सुमारे ६० उमेदवारांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या उमेदवारांनी प्रश्नपत्रिका खरेदी करण्याची तयारी दर्शवल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची चौकशी सुरू असून त्याला बिहारमधील समस्तीपूर येथे नेऊन त्याच्या इतर साथीदारांचा आणि संपूर्ण रॅकेटचा तपास केला जात आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातही फुटलेल्या प्रश्नपत्रिका खरेदी करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू आहे. एसआयटीच्या तपासातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ज्या प्रिंटिंग प्रेसला गेल्या २० ते ३० वर्षांपासून सरकारी परीक्षांच्या प्रश्नपत्रिका छापण्याचे कंत्राट देण्यात येत होते, त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था कधीच उभारण्यात आली नव्हती. इतक्या संवेदनशील कामासाठी सुरक्षेतील त्रुटी असूनही या संस्थेलाच सातत्याने कंत्राट देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली असून, तपास यंत्रणा संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहे.