वर्धा,
primary-health-centre : आंजी मोठी येथील भाविका बोरसरे या १५ वर्षीय मुलीला सर्पदंश झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉटरांनी प्राथमिक उपचार न करताच वर्धेला रेफर केले. वर्धेला नेत असतानाच भाविकाचा मृत्यू झाला. दरम्यान, नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक देत चिमुकलीवर उपचारात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत अधिकार्यांच्या चौकशीची मागणी केली.
भाविका बोरसरे हिला सर्पदंश झाल्यानंतर रात्री १२ वाजता आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले होते. तेव्हा येथील वैद्यकीय अधिकार्यांनी प्रथमोपचार पूर्ण न करताच वर्धा किंवा सेवाग्राम येथे पाठविले. तेव्हा येथे असलेली रुग्णवाहिका देखील देण्यात आली नाही. अखेर तिला खाजगी वाहनाने सेवाग्राम येथे नेण्यात आल्याचा आरोप गावकर्यांनी केला. सेवाग्राम येथील दवाखान्यात नेताच तेथील डॉटरांनी तिला मृत घोषित केले. जर तिच्यावर आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार झाला असता तर जीव वाचवू शकला असता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेची दखल घेत संतप्त नागरिकांनी आंजी प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक दिली.
आपण प्रथमोपचार न करता रुग्णाला रेफर का केले, तसेच रुग्णवाहिका का दिली नाही, असा प्रश्न नागरिकांनी वैद्यकीय अधिकार्यांना विचारला असता त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी, औषध वितरण करणारे कर्मचारी व रुग्णवाहिका चालक यांना निलंबित करण्याची मागणी केली. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी स्वप्नील बेले यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना पाठवून निलंबनाचे आदेश दिले. या चर्चेत गावातील सतीश पवार, सुनील गफाट, संजय कुरेकर, आनंद नागपुरे, आशीष वाटमोडे यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णवाहिका चालक निलंबित
भाविका बोरसरे या मुलीला रविवारी सर्पदंश झाल्यानंतर रात्री १२ वाजता तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉटरांनी प्राथमिक उपचार पूर्ण न करता वर्धा येथे हलविण्यास सांगितले. या दरम्यान, रुग्णालयात रुग्णवाहिका चालक उपस्थित नसल्याची सबब पुढे करीत रुग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.