आता शहरात राहणार ‘व्हिजीबल पोलिसींग’ !

- कोणतीही हयगय खपवून घेणार नाही : पोलिस आयुक्तांचा आक्रमक पवित्रा

    दिनांक :29-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
 
नागपूर,

nagpur police रस्त्यावर पोलिस कर्मचारी किंवा पोलिसांचे वाहन दिसल्यास कोणत्याही गुन्हेगाराची शहरात फिरण्याची हिम्मत होणार नाही. गुन्हेगारीमध्ये घट होण्यासाठी पोलिस रस्त्यावर दिसणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता आता पोलिस कर्मचाऱ्यांची गस्त आणि फिक्स पॉईंट चोवीस तास राहणार असून ‘व्हिजीबल पोलिसींग’वर भर देण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तांनी ठाणेदारांना धारेवर धरत गस्त आणि ‘फिक्स पॉईंट’ लावून रस्त्यावर नियमित पोलिस दिसतील, असे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
 

अनिल कांबळे 
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला असता त्यांना काही त्रृटी लक्षात आल्या. त्यांना रस्त्यावर फिक्स पॉईंट आणि गस्त घालणाऱ्या बीट मार्शल पोलिसांमध्ये समन्वय नसल्याचे लक्षात आले. यावर आयुक्तांनी तिव्र नाराजी व्यक्त करीत सर्व ठाणेदारांना धारेवर धरले. शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यासाठी काही नवीन बदल त्यांनी सूचवले आहे. बीट मार्शल आणि फिक्स पॉईंट यांच्या कर्तव्याचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या. रोज रात्री आणि दिवसा बीट मार्शल काठी, पिस्तूलसह गस्त घालतील. पिकेट किंवा बॅरीकेडिंग असलेल्या ठिकाणी पोलिसांकडे रायफल आणि काठी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिवसासुद्धा मार्केट परिसर, शॉप, शाळा, बाजार, भाजीपाला विक्री होणारे रस्ते, मोठी दुकाने, मॉल, मैदान-बगिचा, ग्राहकांची वर्दळीची स्ठळे इत्यादी ठिकाणी ‘स्मार्ट पॅट्रोलिंग’ करण्यात येणार आहे. ठाणेदाराच्या वाहनांसह पोलिसांची वाहने रस्त्यावर दिसणार आहेत. सर्व अंमलदार ‘क्युआर कोड’ स्वाईप करुन गस्त घालणार आहेत. त्यामुळे पोलिस ‘व्हिजीबल’ राहतील. नागरिकांना रस्त्यावर पोलिस कर्मचारी किंवा पोलिस वाहन फिरताना दिसल्यास त्यांच्या पोलिसांबद्दल आदर आणि विश्वास निर्माण होईल. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीलाही आळा बसेल, असा विश्वास पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केला.

रात्रीच्या ‘कोंबींग’वर भर
दररोज रात्री कोबींगवर भर देण्यात येणार आहे. पोलिस मुख्यालयातून जवळपास ५० पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या मदतीला राहणार आहेत. नवनियुक्त पोलिस कर्मचाऱ्यांना रात्रगस्तीसाठी मदतीला पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर राहणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीस समूळ नष्ट करण्यासाठी कोंबींगच्या माध्यमातून संपूर्ण शहर पिंजून काढण्यात येणार आहे.
 
 
जमत नसेल तर अर्ज द्या... आम्ही दखल घेऊ
पोलिस आयुक्तांनी पहिल्यांदाच आक्रमक पवित्रा घेत ठाणेदारांना तंबी दिली आहे. गस्त आणि रात्रीच्या पोलिस बंदोबस्ताच्या नियोजनात कोणतीही हयगय खपवून घेण्यात येणार नाही. ज्यांना जमत नसेल, त्यांनी अर्ज द्यावा, त्यांची गांभीर्याने दखल घेऊ, असा खणखणीत इशारासुद्धा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ठाणेदारांना चांगलेच धारेवर धरले आहे.