गजानन शुक्ला
pune police पोलिस दल हे कायद्याचे रक्षक पोलिस मानले जाते. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांच्याकडूनच कायद्याचा गैरवापर होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. पुण्यातील एक कोटी रुपयांच्या दरोडा प्रकरणाने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
या प्रकरणात व्यावसायिकाकडील रोकड जप्त करण्याच्या नावाखाली बॅगेतील २० लाख रुपये काढून केवळ साडेसहा लाख रुपये मुद्देमालात दाखविण्याचा कथित डाव रचल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका महिला पोलिस हवालदारासह पोलिस नाईक आणि तोतया पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेतील काही घटकच जर अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तींशी हातमिळवणी करत असतील, तर तो केवळ एका गुन्ह्याचा विषय राहत नाही; तो संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार ठरतो.
या घटनेतील एक सकारात्मक बाब म्हणजे राजगड पोलिस ठाण्यााचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी दाखविलेली सतर्कता. संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिस चौकी गाठली, रोकड पुन्हा मोजली आणि प्रकार उघडकीस आणला. अन्यथा लाखो रुपयांचीअफरातफर कदाचित कधीच समोर आली नसती. यावरून रून एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे संपूर्ण कट कसा उधळला जाऊ शकतो, हे स्पष्ट होते.
या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे खेडशिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसणे. आज डिजिटल युगात पोलिस ठाणे आणि चौक्यांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य असताना अशी त्रुटी गंभीर मानावी लागेल. सुदैवाने समोरील हॉटेलच्या कॅमेऱ्यात काही हालचाली कैद झाल्या; अन्यथा सत्य बाहेर येणे आणखी कठीण झाले असते.ही घटना अपवाद म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. कारण याआधीही काही ठिकाणी पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर, तपासातील निष्काळजीपणा किंवा भ्रष्टाचाराची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांत केवळ गुन्हा दाखल करून थांबणे पुरेसे नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संस्थात्मक सुधारणा तितक्याच आवश्यक आहेत.
पोलिस दलातील हजारो अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे, जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. मात्र, काही मोजक्या व्यक्तींच्या गैरकृत्यांमुळे संपूर्ण दलाची प्रतिमा मलीन होते. म्हणूनच अशा प्रकरणांत कोणालाही पाठीशी न घालता निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करणे, हीच पोलिस दलावरील जनतेचा विश्वास टिकविण्याची खरी कसोटी आहे. कुंपणच शेत खात आहे" ही म्हण या घटनेला लागू पडते.