मोहाडी,
tractor sank in the middle of the riverbed जिल्हा प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेज (प्रकल्प ) येथून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीच्या पात्रात ट्रॅक्टर साहित्यासह बुडाले. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या आणि वाढणाऱ्या पाण्यातून ट्रॅक्टर मधील तिघांनी कसा बसा आपला जीवाचं नदीचा किनारा गाठला, अन्यथा आज मोठी दुर्घटना जिल्ह्यात झाली असती. दरम्यान गोंदिया जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा तीन जीवांवर बेतता राहिला.

मोहाडी तालुक्यातील माडगी येथे असलेल्या वैनगंगा नदीवर रेल्वेचा पूल आहे. पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आवश्यक ते साहित्य घेऊन भाडे तत्वावर माडगी येथील आनंद बुधे हे वैनगंगा नदी पात्रातून रेल्वे पुलाखाली पोहोचले होते. दिवसभर काम झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास परतण्याच्या वेळी अचानक वैनगंगेच्या पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला. आतापर्यंत कोरडी असलेल्या वैनगंगेत अचानक आलेले पाणी आणि त्याचा वेग पाहून ट्रॅक्टर सह बुधे आणि त्यांचे तीन सहकारी परत निघाले. नदी पत्रातून किनाऱ्याकडे जात असताना प्रचंड वाढलेल्या पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बुधे यांचे ट्रॅक्टर मधोमध येऊन बुडाले. ट्रॅक्टर सोबत तिघांचीही जीव जाण्याच्या स्थितीत आले असताना दोराच्या सहाय्याने तिघेही कसे तरी बाहेर पडले व आपला जीव वाचवीला. ट्रॅक्टर मात्र पूर्णपणे पाण्याखाली गेले. प्रसंगावधान दाखविल्याने तिघांचे प्राण वाचले.
या घटनेनंतर गोंदिया जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. या जिल्ह्यातील धापेवाडा ब्यारेज येथून सकाळीच नऊ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. दुपारनंतर पाण्याचा वेग वाढविण्यात आला. मात्र घटना घडून गेली तरीही भंडारा जिल्हा प्रशासनाला कोणतीही सूचना दिली गेली नव्हती. अशा सूचना मिळाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येते. या ठिकाणी पाणी सोडण्यासंदर्भात सूचना नसल्याने आज तिघांच्या जीवावर बेतता-बेतता राहिले.
कार्यकारी अभियंता नोटीस बजावली
दरम्यान ही घटना भंडारा जिल्हा प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने घेत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा केली. या गंभीर विषयाच्या संदर्भात कार्यकारी अभियंता धापेवाडा बॅरेज यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी तभाला सांगितले. आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भातील नियमावलीचे पालन झाले नसून यामुळे मोठा अनर्थ होऊ शकला असता. त्यामुळे या संदर्भात असलेले संकेत पाळले जावे, असेही सांगण्यात आल्याचे समजते.