कारंजा लाड,
Aarushi Dhore महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-—२६ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत आर. जे. चवरे प्राथमिक शाळा, हायस्कूल व कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आरुषी रुपेश ढोरे हिने राज्य गुणवत्ता यादीत १३ वा क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता पाचवीतील १४ विद्यार्थ्यांनी व आठवीच्या एकूण ३४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध अध्यापन यांचा मोठा वाटा आहे. कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमल चवरे यांनी शिक्षकांना वेळोवेळी या यशासाठी मार्गदर्शन केले.या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सदस्य, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीही शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी अशाच प्रकारे राज्यस्तरावर यश संपादन करतील, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.