मुंबई
abhijeet sawant जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत पहिल्या ‘इंडियन आयडॉल’चा मानकरी ठरलेला ट्रेंडसेटर गायक अभिजीत सावंत पुन्हा एकदा ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर झळकणार आहे. आजवर अनेक सुपरहिट गाण्यांद्वारे रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिजीतची यंदा सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘इंडियन आयडॉल’च्या नव्या पर्वात विशेष उपस्थिती पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमधून ‘इंडियन आयडॉल’च्या वीकेंड स्पेशल भागात अभिजीत सावंत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील असंख्य गायकांसाठी प्रेरणादायी आणि कायम स्मरणात राहिलेला हा मंच अभिजीतच्या आयुष्यातही अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा या मंचावर पाहण्याची संधी चाहत्यांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.
‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर पुन्हा परतण्याच्या भावनेबद्दलabhijeet sawant अभिजीत सावंत म्हणाला, “इंडियन आयडॉलसारखा मंच, जो आज अनेक संगीतकार आणि गायकांना प्रोत्साहन देतो, अशा मंचावर पुन्हा जाणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास आहे. पहिला विजेता म्हणून मिळालेला सन्मान आणि आज स्पेशल गेस्ट म्हणून त्याच मंचावर जाऊन परफॉर्म करण्याची संधी मिळणं ही अतिशय सुखद भावना आहे. इंडियन आयडॉलच्या मंचावर पुन्हा एकदा जाणं म्हणजे अगदी घरी परतल्यासारखं वाटतं. जिथून माझ्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात झाली, तिथे पुन्हा जाऊन अनेक गायकांची गाणी अनुभवण्याचा हा अनुभव शब्दांत व्यक्त करणं अशक्य आहे.”