तेहरान,
Araghchi and Ghalibaf assassination plot इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक दावा समोर आला आहे. अमेरिकन वृत्तपत्राच्या अहवालानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात अंतरिम शांतता करारासाठी चर्चा सुरू असताना इस्रायलने इराणच्या वरिष्ठ वाटाघाटीकारांना लक्ष्य करण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्तात अमेरिकेचे विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार, एप्रिलमध्ये सुरू झालेल्या शस्त्रसंधी चर्चेदरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्यावर संभाव्य हल्ल्याची शक्यता निर्माण झाली होती. हे दोन्ही नेते शांतता वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत अमेरिकेची चिंता वाढली होती.

वॉशिंग्टनला भीती होती की, या नेत्यांवर हल्ला झाल्यास अमेरिका-इराण चर्चेला मोठा धक्का बसू शकतो आणि शांतता प्रक्रियाच कोलमडू शकते. याच कारणामुळे अमेरिकेने प्रदेशातील काही देशांना इराणला संभाव्य धोक्याची माहिती देण्यास सांगितल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.अहवालात पुढे म्हटले आहे की, युद्धाच्या सुरुवातीपासूनच इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करणे ही इस्रायलची प्रमुख रणनीती राहिली आहे. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांमध्ये इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. एका बाजूला अमेरिकन लष्कर इराणची नौदल आणि क्षेपणास्त्र क्षमता कमकुवत करण्यावर लक्ष केंद्रित करत होते, तर दुसऱ्या बाजूला इस्रायलने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावर थेट दबाव वाढवण्याची रणनीती स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलच्या लक्ष्य यादीत वरिष्ठ राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली लारीजानी आणि माजी परराष्ट्र मंत्री कमाल खराझी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचाही समावेश होता.
अहवालानुसार, अब्बास अराघची आणि मोहम्मद बागेर गालिबाफ हे युद्धविराम आणि दीर्घकालीन शांततेसंदर्भात अमेरिका तसेच इतर देशांशी संवाद साधत होते. त्यामुळेच हे दोन्ही नेते इस्रायलच्या रडारवर असल्याचा दावा करण्यात आला आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाला गालिबाफ यांच्यावर संभाव्य हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला अशी कारवाई टाळण्याचा सल्ला दिला होता. एप्रिलमध्ये अराघची आणि गालिबाफ हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांच्याशी चर्चेसाठी इस्लामाबादला जाणार होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. इराणी शिष्टमंडळाला घेऊन जाणाऱ्या विमानाला पाकिस्तानी लढाऊ विमानांनी सुरक्षा दिल्याचेही वृत्तात नमूद आहे. तेहरानला परतताना इराणी सुरक्षा यंत्रणांनी विमानाला संभाव्य हल्ल्याचा इशारा दिला होता. गुप्तचर माहितीच्या आधारे इस्रायल हल्ल्याच्या तयारीत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. संभाव्य धोक्यामुळे इराणी विमानाने थेट तेहरानला न जाता मशहद विमानतळावर लँडिंग केले. त्यानंतर शिष्टमंडळाने रस्त्याने सुमारे आठ तासांचा प्रवास करत तेहरान गाठले. मात्र, या संपूर्ण प्रकरणातील दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच इस्रायल, अमेरिका किंवा इराणकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.