सिंगापूर,
bilhari kausikan पाकिस्तान हा सतत अपयशाच्या उंबरठ्यावर असलेला देश आहे. त्यांच्याकडे अणुबॉम्ब नसता, तर जगाने त्यांची दखलही घेतली नसती, अशा शब्दात टीका करत सिंगापूरचे माजी राजदूत बिलहरी कौसिकन यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला. एका आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना कौसिकन यांनी पाकिस्तानचे राजनैतिक धोरण, सरकारमधील लष्करी हस्तक्षेप आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवर टिप्पणी करताना म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण वातावरणात, पाकिस्तानने स्वतःला शांतता प्रस्थापित करणारा देश म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानी लष्कर आणि नेतृत्वाने राजनैतिक संधीचा फायदा घेण्यास तत्परता दाखवली, पण राजनैतिक यशाने जनतेचे पोट भरत नाही. सद्यस्थितीत पाकिस्तान सर्वच आघाडीवर गंभीर समस्यांना तोंड देत आहे. पाकिस्तानची मुख्य समस्या राजनैतिक नसून, ती त्याच्या अंतर्गत पायाभूत रचनेत आहे. अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन आणि जिहादी गटांना पाठबळ यामुळे जागतिक पटलावर त्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्यामुळेच जग पाकिस्तानची दखल घेते, अन्यथा त्यांना कोणी विचारले देखील नसते.
लष्करप्रमुख समस्यांचे मूळ
पाकिस्तान अणुशस्त्रधारी देश नसता, तर जगातील कोणत्याही देशाला त्याच्या पतनाची किंवा त्याच्या अस्तित्वाचीही चिंता वाटली नसती. पाकिस्तान अगदी सुरुवातीपासूनच गैरव्यवस्थापनाचा बळी ठरला आहे. जे देश आपल्या समस्यांसाठी अफगाणिस्तान किंवा भारतासारख्या इतरांना सतत दोष देतात, ते कधीही समस्यांवर मात करू शकत नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख हे देशाला कोसळण्यापासून वाचवणारा आधारस्तंभ असला तरीही तेच देशाच्या समस्यांचे मूळ आहे.