लंडन,
Births have stalled इंग्लंड आणि वेल्समध्ये लोकसंख्येच्या आकडेवारीत मोठा बदल समोर आला आहे. ताज्या अंदाजानुसार, आता दरवर्षी जन्मांच्या तुलनेत मृत्यूंची संख्या अधिक असणार आहे. गेल्या ५० वर्षांतील हा सर्वात मोठा लोकसंख्याशास्त्रीय बदल मानला जात असून तज्ज्ञांनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 'सेंटर फॉर सोशल जस्टिस' या सामाजिक विचारगटाने या परिस्थितीला ‘डेथ डे’ असे नाव दिले आहे. संस्थेच्या मते, ही केवळ आकडेवारी नसून भविष्यातील सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा स्पष्ट इशारा आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजानुसार, जुलै २०२६ पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये मृत्यूंची संख्या जन्मांपेक्षा जास्त राहणार आहे. २०२५-२६ हे शेवटचे आर्थिक वर्ष ठरणार आहे, ज्यामध्ये जन्मांची संख्या किंचित अधिक होती.

अंदाजानुसार, २०२६-२७ या कालावधीत सुमारे ५८.४ दशलक्ष जन्म होतील, तर याच काळात सुमारे ५८.८ दशलक्ष मृत्यू होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जन्मांच्या तुलनेत मृत्यूंची संख्या स्पष्टपणे जास्त राहणार आहे.तज्ज्ञांच्या मते, यामागे सातत्याने घसरत असलेला जन्मदर हे मुख्य कारण आहे. वाढती घरांची किंमत, मुलांच्या संगोपनाचा वाढता खर्च, करिअरवरील लक्ष, उशिरा होणारे विवाह आणि बदलती जीवनशैली यांचा थेट परिणाम कुटुंब नियोजनावर होत आहे. संशोधनानुसार, २०२४ ते २०३४ या कालावधीत यूकेमध्ये जन्मांपेक्षा सुमारे ४.५ लाख अधिक मृत्यू होऊ शकतात. तसेच १६ ते ४५ वयोगटातील जवळपास ३० लाख महिला निःसंतान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही संख्या मागील पिढ्यांच्या तुलनेत सुमारे ६ लाखांनी जास्त आहे.
जन्मदर २०१० पासून सातत्याने घसरला
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अनेकांना कुटुंब सुरू करण्याची इच्छा असली तरी आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे ते निर्णय पुढे ढकलत आहेत. त्यामुळे भविष्यात कामगार संख्या, अर्थव्यवस्था आणि सामाजिक संरचनेवर मोठा परिणाम होऊ शकतो. ब्रिटनमध्ये जन्मदर २०१० पासून सातत्याने घसरत आहे. २०२५ मध्ये सुमारे ५,८५,००० जन्मांची नोंद झाली, जी १९७७ नंतरची सर्वात कमी पातळी मानली जाते. प्रति स्त्री मुलांची सरासरी संख्या आता १.४ वर आली आहे, तर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हा आकडा किमान २.१ असणे आवश्यक मानले जाते. महिलांचे पहिल्यांदा आई होण्याचे सरासरी वयही २९.६ वर्षांपर्यंत वाढले आहे.