सेलू,
Power Supply भारतीय जनता युवा मोर्चा, सेलू तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयात वारंवार होणाऱ्या वीज खंडितच्या समस्येसह स्मार्ट मीटर विरोधात उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील स्मार्ट मीटर काढून त्याऐवजी जुने वीज मीटर बसविण्यात यावेत तसेच स्मार्ट मीटर बसविणे हे ऐच्छिक ठेवून ग्राहकांच्या संमतीनंतरच त्यांची अंमलबजावणी करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
सेलू शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरी वीज यंत्रणा, कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर व डीपी यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर उपविभागीय अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने वीज वाहिन्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या भागात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर किंवा डीपीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आवश्यक यंत्रणा उभारण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
येत्या आठ दिवसांत या प्रश्नांवर ठोस उपाययोजना न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.निवेदन देतेवेळी भाजपाचे जिल्हा सचिव संजय जयस्वाल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नरेश पाठक, तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खोडे, शहराध्यक्ष ओमदेव सावरकर, भाजयुमो जिल्हा सचिव शिवा डुकरे, दिनेश कामीणकर आदींसह भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.