नवी दिल्ली,
china hacked the e rickshaws battery धावत्या ई-रिक्षा थांबवणाऱ्या चिनी मोबाईल ॲप्सविरोधात केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने बीएटी-बीएमएस, लॉसिगी आणि इपोक्ल-इ-इऑन सारखे ॲप्स प्ले स्टोअरवरून तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. ब्लूटूथ-आधारित लिथियम बॅटरी असलेल्या ई-रिक्षा बंद पाडणाऱ्या या ॲप्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते़ त्यामुळे सुरक्षेबाबत चिंता वाढली होती. अशाच प्रकारे गैरवापर होणारे इतर ॲप्सदेखील ब्लॉक केले जातील, असेही सरकारन स्पष्ट केले आहे.
सरकारच्या मते, हे ॲप्स मूळतः बॅटरीची चाचणी आणि सर्व्हिसिंगसाठी तयार केले गेले होते़ परंतु, काही लोक त्यांचा गैरवापर करत होते. अशा प्रकरणांमध्ये ते परवानगीशिवाय ई-रिक्षाच्या बॅटरीशी कनेक्ट होऊन वाहनाचा वीजपुरवठा खंडित करू शकत होते. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने तात्काळ कारवाई करत संबंधित ॲप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशा कोणत्याही ॲप्समुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले की, ॲप स्टोअर चालकांना अशा ॲप्सची तपासणी करताना अधिक सतर्क राहावे लागेल. सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे ॲप्स भविष्यात उपलब्ध होणार नाहीत, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार ॲप स्टोअर कंपन्यांसोबत मिळून एक यंत्रणा विकसित करेल.
हे ॲप्स कसे बनले धोकादायक?
बीएटी-बीएमएस आणि तत्सम ॲप्स ब्लूटूथ तंत्रज्ञानाद्वारे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीमशी जोडले जातात. बॅटरी चार्ज, व्होल्टेज, तापमान आणि इतर तांत्रिक माहितीवर लक्ष ठेवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. तथापि, काही स्वस्त लिथियम-आयन बॅटरी सिस्टीममध्ये पासवर्ड किंवा सुरक्षा वैशिष्ट्ये नसल्यामुळे ब्लूटूथच्या रेंजमधील कोणीही बॅटरीशी कनेक्ट होऊ शकत होते. त्यानंतर, ॲपमधील ‘डिस्चार्ज’ किंवा ‘ऑन-ऑफ’ पर्याय दाबून ई-रिक्षा बंद केली जाऊ शकते. यामुळे वाहन अचानक थांबून अपघात होऊ शकतो.