मुंबई,
national common mobility card संपूर्ण देशभरात राबविल्या जाणाऱ्या ‘एक देश, एक कार्ड’ या संकल्पनेला गती देण्यासाठी आणि राज्य परिवहन महामंडळाचे कामकाज अधिक पारदर्शक व डिजिटल करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ म्हणजेच स्मार्ट कार्ड योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाच्या आकडेवारीनुसार, ३० जूनपर्यंत तब्बल ६२,८६,७६५ प्रवाशांनी या कार्डसाठी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून त्यापैकी ३५,५२,३३२ प्रवाशांचे कार्ड प्रत्यक्ष सक्रिय झाले आहेत.
महिलांना मिळणारी तिकीट सवलत, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिकांची सवलत आणि ७५ वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेचे लाभार्थी यांना येत्या १ ऑगस्ट २०२६ पासून प्रवासादरम्यान हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड जवळ बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल, त्यांना पुढील महिन्यापासून कोणत्याही प्रकारच्या सवलतीचा लाभ मिळणे दुरापास्त होणार आहे. कार्ड नसलेल्या प्रवाशांना सवलत नाकारली जाणार आहे.
नोंदणीमध्ये छत्रपती संभाजीनगरची बाजी
ऐनवेळी होणारी गैरसोय आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी सवलतधारक प्रवाशांनी लवकरात लवकर जवळच्या अधिकृत एसटी आगार किंवा नोंदणी केंद्रावर जाऊन आपली कार्ड प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले. कार्ड नोंदणीमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने सर्वाधिक उत्सुकता दाखवली असून तिथे तब्बल १५ लाख ९३ हजारांवर प्रवाशांनी नोंदणी करीत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल पुणे आणि नाशिक प्रदेशांनी आघाडी घेतली आहे.