तिरोडा,
Dabbetoal Murder Case तालुक्यातील डब्बेटोला येथील मुनिलाल वारलू कटरे यांच्या खून प्रकरणात गंभीर बाब समोर आली असून, घटनेला बराच कालावधी लोटूनही सर्व आरोपींवर ठोस कारवाई न झाल्याचा आरोप मृताची बहिण फिर्यादी श्यामकला कटरे यांनी पत्रकार परिषदेतून केला असून पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
श्यामकला कटरे यांनी पत्र परिषदेत सांगितले की, या प्रकरणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
तक्रारीनुसार, 14 मे रोजी स्व. मुनिलाल कटरे यांचा खून झाला. या घटनेत एकूण आठ आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असताना पोलिसांनी केवळ चार आरोपींना अटक केली आहे. उर्वरित चार आरोपी अद्याप मोकाट असून गावात खुलेआम फिरत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नमूद तक्रारीनुसार आरोपींकडून मृताच्या कुटुंबीयांना सातत्याने धमकावले जात असून गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आरोपींकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करणे, त्रास देणे, खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच मृताच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार श्यामकला कटरे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणाकडे पोलिस प्रशासन गांभीर्याने पाहणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून न्याय मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर तिरोडाचे ठाणेदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी चौकशी सुरू असल्याचे तभाला सांगितले.