नवी दिल्ली,
Earth's heat due to Sun's temperature १ जुलैच्या मध्यरात्री सूर्यावर झालेल्या अत्यंत शक्तिशाली सौर उद्रेकामुळे जगभरातील अंतराळ संस्था सतर्क झाल्या आहेत. शास्त्रज्ञांनी या घटनेची नोंद एक्स-क्लास सौर ज्वाला म्हणून केली असून, ही सौर ज्वालांची सर्वात शक्तिशाली श्रेणी मानली जाते. या घटनेनंतर अंतराळ हवामानातील संभाव्य बदलांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शियन विज्ञान अकादमी अंतर्गत कार्यरत सोलर लॅबोरेटरीने या सौर उद्रेकाची अधिकृत पुष्टी केली आहे. शास्त्रज्ञ सौर ज्वालांचे ए, बी, सी, एम आणि एक्स अशा पाच स्तरांमध्ये वर्गीकरण करतात. यामध्ये एक्स-क्लास हा सर्वाधिक तीव्र प्रकार असून प्रत्येक पुढील श्रेणी मागील श्रेणीपेक्षा जवळपास १० पट अधिक शक्तिशाली असते.

तज्ज्ञांच्या मते, सौर ज्वालांच्या वेळी सूर्य मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि विद्युतभारित कण अवकाशात सोडतो. जर या उद्रेकासोबत कोरोनल मास इजेक्शन (CME) पृथ्वीच्या दिशेने आले आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी त्याचा संपर्क झाला, तर भूचुंबकीय वादळ निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत उपग्रह सेवा, रेडिओ संपर्क, जीपीएस आणि उच्च-फ्रिक्वेन्सी संप्रेषण प्रणालींवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. काही गंभीर परिस्थितींमध्ये वीज वितरण यंत्रणेलाही फटका बसू शकतो. मात्र, याचा परिणाम सौर उद्रेकाची दिशा आणि तीव्रता यावर अवलंबून असतो.
विशेष म्हणजे, या मोठ्या सौर उद्रेकाच्या आदल्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी सलग तीन एम-क्लास सौर उद्रेकांचीही नोंद झाली होती. एक्स-क्लासनंतर एम-क्लास ही दुसऱ्या क्रमांकाची शक्तिशाली श्रेणी मानली जाते. कमी कालावधीत अशा सलग सौर घडामोडी होत असल्याने वैज्ञानिक अधिक सावध झाले आहेत. बर्मिंगहॅम विद्यापीठातील शास्त्रज्ञ सूर्याच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या लहरी आणि कंपनांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या मते, या कंपनांचा संबंध सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांशी असू शकतो. याच बदलांचा परिणाम अंतराळ हवामानावरही होत असल्याचे संशोधनातून समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सूर्य सध्या त्याच्या ११ वर्षांच्या सौर चक्राच्या शिखराच्या टप्प्याजवळ आहे. या काळात सूर्यडाग, सौर ज्वाला आणि विविध खगोलीय घडामोडींमध्ये वाढ होते. त्यामुळे आगामी काळात अशा आणखी तीव्र सौर घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.