पुणे
ek hota malin पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर ओढवलेल्या भीषण दुर्घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा मराठी चित्रपट येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
माळीण गावातील ग्रामस्थ पाऊस पडावा म्हणून वरुणराजाची प्रार्थना करून आदल्या दिवशी रात्री निर्धास्त झोपी गेले होते. मात्र, त्याच रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण गावच पावसाच्या तडाख्यात वाहून गेले आणि कल्पनाही करता येणार नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली. या हृदयद्रावक सत्यघटनेवर ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाची कथा आधारित आहे.
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनचे संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर आणि राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनचे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे आणि राजु राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा आणि पटकथा राजु राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजु राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन केले असून युवराज गोंगले यांनी गीतलेखनासह संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वर दिले आहेत. कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर यांचे असून व्हीएफएक्सची जबाबदारी रहमान अब्दुल्ला यांनी सांभाळली आहे. महेश भारंबे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक राजु राणे यांनी ek hota malin या सत्यघटनेचे वास्तव पडद्यावर अचूकपणे मांडण्यासाठी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्याकडून माहिती संकलित केली आणि त्याआधारे कथानक उभे करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण बदलापूर येथे करण्यात आले असून कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी उभारलेला माळीण गावाचा सेट विशेष लक्षवेधी ठरतो. दमदार कलाकार, प्रभावी व्हीएफएक्स आणि हृदयस्पर्शी संगीत ही या चित्रपटाची प्रमुख बलस्थानं असून प्रदर्शित झालेला टीझर पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. अचानक घडलेल्या या भीषण आपत्तीमुळे ग्रामस्थांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असेल आणि अनेकांची भविष्यातील स्वप्ने काही क्षणांत कशी उद्ध्वस्त झाली असतील, याची तीव्र जाणीव हा चित्रपट करून देण्याचा प्रयत्न करतो.